
व्यंकटापूर येथील उसळत्या पाण्याचे कुंड
अहेरी तालुका हा घनदाट जंगल आणि राजेशाहीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु येथील गर्द वनराईत काही गोष्टी नवलाईच्या आहेत.व्यंकटापूर येथे असलेले उसळत्या पाण्याचे कुंड हेही त्यातीलच एक. गावापासून दोनशे मीटर अंतरावरील जंगलात प्रवेश केला की, तेथे एक छोटासा खड्डा दिसतो. या खड्ड्यात पाणी असते आणि त्यातून बुडबुडे येत असतात. टाळ्या वाजविल्या की बुडबुड्यांचे प्रमाण वाढते. पाणी संथ असते; मात्र टाळीचा आवाज जितका जोराचा, तितकेच बुडबुडेही अधिक निघतात. या नैसर्गिक कुंडाबाबत नागरिकांना प्रचंड आकर्षण आहे. नागरिक व्यंकटापूरला गेले की आवर्जून या उसळत्या पाण्याच्या कुंडाला भेट देतात.
विशेष म्हणजे, त्या भागातील आदिवासी दरवर्षी तेथे एकत्र येऊन आपल्या देव-देवतांची पूजा-अर्चा करतात. कोंबड्या, बकर्यांचे बळीही देतात. कोणी पर्यटक आले तरी त्यांना त्या कुंडात उतरण्याची परवानगी नसते. हे कुंड आतून किती खोल आहे, याचा काहीच अंदाज नाही. तेथे पूर्वी सहा ते सात कुंड होते. त्यांचे
आकारही मोठे होते. कालांतराने काही कुंड नाहीसे झाले. आता केवळ तीन ते चार कुंड शिल्लक आहेत, असे जुने लोक सांगतात. हे कुंड आदिवासींसाठी श्रद्धेचं स्थान, पर्यटकांसाठी कुतूहल, तर वैज्ञानिक चिकित्सकांसाठी संशोधनाचेकेंद्र बनले आहे.