
जमीनीचा वापर
जिल्हयाचे एकूण भौगोलीक क्षेत्र 1491554 हेक्टर असुन त्यापैकी आरक्षीत जंगल 666111 हेक्टर इतके आहे. 2002-2003 मध्ये 17.68 टक्के लागवडीलायक असून 4.10 टक्के क्षेत्र कायम गुरेचरण व इतर चराईच्या (पडीत) जमीनी खालील तर 4.92 टक्के क्षेत्र शेतीकरीता उपयुक्त नसलेले क्षेत्र आहे. सन 2002-03 मध्ये एकूण लागवडी खालील 190282 हेक्टर क्षेत्रापैकी 142367 हेक्टर क्षेत्र निव्वळ पिकाखाली असून ते लागवडी खालील क्षेत्राच्या 74.82 टक्के इतके आहे. तसेच या जिल्हयातील जंगल व्याप्त क्षेत्राचे प्रमाण जास्त असून ते एकूण भौगोलीक क्षेत्राच्या 75.95 टक्के इतके आढळते. राज्यात सर्वात जास्त जंगलव्याप्त क्षेत्र व सर्वात कमी लागवडी खालील क्षेत्र गडचिरोली जिल्हयातच आहे.
पिक पध्दती
2002-03 या वर्षामध्ये एकूण पिकाखालील क्षेत्र 190282 हेक्टर असून अन्य पिकापैकी सर्वात जास्त क्षेत्र भात पिकाखाली म्हणजे 75.72 टक्के आहे. 2002-03 या वर्षात सर्वात जास्त भाताखालील क्षेत्र आरमोरी तहसिलीत 17837 हेक्टर म्हणजे 12.38 टक्के आहे. तसेच एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी डाळी वर्गीय पिकाखालील क्षेत्र 19333 हेक्टर व गळीताचे क्षेत्र 7093 हेक्टर इतके होते.
मुख्य पिकांचे दर हेक्टरी उत्पादन
जिल्हयामध्ये भात, ज्वारी, गहू, तूर, तिळ व जवस ही मुख्य पिके होतात. सन 2008-2009 मध्ये भाताचे दर हेक्टरी उत्पादन 844 कि.ग्रा., गहू 889 कि.ग्रा., ज्वारी 500 कि.ग्रा, हरभरा 500 कि.ग्रा., तुर 575 कि.ग्रा, उळीद 455 कि.ग्रा., तिळ 308 कि.ग्रा.व जवस 143 कि.ग्रा. अशा प्रकारे होते. एकंदरीत गेल्यावर्षाचे तुलनेत तांदूळ, उडीद,कापूस,मिरची, लसूण ,या पिकांचे दर हेक्टरी उत्पादनात वाढ झालेली आहे. तर ,जवस, ज्वारी, गहू व मका मिरची, आले, हळद, बटाटे या पिकांचे उत्पादनात घट झालेली दिसुन येते.
फळे व भाजीपाला
या जिल्हयामध्ये 2002-03 या वर्षात फळे व भाजीपाला या पिकाखालील एकूण क्षेत्र 60455 हेक्टर असून एकूण पिकाखालील क्षेत्राच्या फक्त 31.77 टक्के होते. जिल्हयात फलोत्पादनाने उत्पादन वाढविण्याकरीता फलोत्पादन विभागामार्फत आंबा, पेरु, लिंबू, काजू, बोर, सिताफळ, मोसंबी व संत्री इत्यादी फळबागांची लागवड करण्यात आली आहे. जिल्हयात सोनापूर,रामगड, वाकडी, कृष्णानगर व कसनसूर येथे रोपवाटीका आहेत.
इतर विकास कार्यक्रम
शेती विकासाच्या दृष्टिने वार्षिक योजनातंर्गत निरनिराळे कार्यक्रम राबविले जातात.
(1) फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत फलोत्पादन विभागामार्फत फळबाग लागवडीसाठी उत्सुक असलेल्या शेतक-यांना अर्थसहाय्य व अनुदानाची व्यवस्था करण्यात येते.
(2) कोरडवाहू विकासाच्या दृष्टिने शासनाने जिल्हयामध्ये कृषिपंढरी योजना सुरु केली आहे.
(3) एकात्मिक ग्रामीण विकास योजान अंतर्गत अत्यल्प व अल्प भुधारक शेतक-यांना नविन विहीरी बांधण्याकरीता व जुन्या विहीरींची दुरुस्ती करण्याकरीता इलेक्ट्रीक मोटारपंप विकत घेण्याकरीता बैलजोडी व बैलगाडी विकत घेण्याकरीता राष्ट्रीयकृत व इतर बॅकाकडून कर्जरुपाने मदत मिळवून देऊन अशा प्रकारे मिळणा-या कर्जावर कमीत कमी 25 ते 33 टक्के सुट ग्रामीण विकास यंत्रणेकडून देण्यात येते.
(4) अल्प भुधारकांनारासायनिक खतांच्या वाढीव किंमतीवर सुट देण्यात येते. किटकनाशके यासाठी कर्ज देण्यात येते.
(5) सध्या तेलबिया विकास कार्यक्रम.
(6) कडधानाच्या विकासाकरीता सध्या उत्पादन कार्यक्रम याशिवाय जिल्हा परिषदेच्या वाढीव उपकराच्या उत्पन्नामधून देखील कृषि विकासावर खर्च करण्यात येतो.
बाजारपेठ
जिल्हयात गडचिरोली, आरमोरी, अहेरी व चामोर्शी येथे कृषि उत्पन्न बाजार समित्या कार्यरत असून त्याठिकाणी विक्री योग्य मालांची विक्री होते.