
सिंचन क्षेत्र :
जिल्हयात सन 2000-01मध्ये स्थुल भिजणारे क्षेत्र 60725 हेक्टर इतके होते. यापैकी सर्वाधिक ओलीताखालील निव्वळ क्षेत्र चामोर्शी तहसिलीत 27.67 टक्के असून त्याखालील गडचिरोली व आरमोरी तहसिलीत अनुक्रमे 14.62 व 14.07 टक्के होते. तर भामरागड तहसिलीत सर्वात अत्यल्प 0.83 टक्के क्षेत्र निव्वळ ओलीताखालील असल्याचे दिसून येते. 2000-01 या वर्षात जिल्हयात ओलीताखालील एकूण क्षेत्र हे एकूण पिकाखालील क्षेत्राच्या 30.88 टक्के होते.
मोठे/लघु सिंचन प्रकल्प
या जिल्हयात 1500 ते 1600 मि. मिटर येवढा प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे विहीरीद्वारे सिंचन फार कमी आहे. लहान-लहान बांध घालून पावसाचे वाहून जाणारे पाणी तलाव अथवा बोडया यामध्ये साठवून ठेऊन त्याव्दारे भात शेतीला पाणी देण्याची प्रथा या जिल्हयात पुर्वापार चालू आहे. जिल्हयात एकही मोठा प्रकल्प नाही. परंतू भंडारा जिल्हयातील इटियाडोह प्रकल्पाचे कालव्याद्वारे 4822 हेक्टर क्षेत्र भिजविण्यात आले. तर रेगडी येथील दिना मध्यम प्रकल्पाद्वारे 10914 हेक्टर क्षेत्रात सिंचन झाले. चामोर्शी तहसिलीतील मुखडी मुलचेरा या गावाजवळ चेन्ना नदीवर मध्यम प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले होते. त्या कालव्यांची लांबी 14 कि.मी.राहणार असून 2630 हेक्टर जमीनी ला पाणी पुरवठा व्हावा अशी अपेक्षा आहे. याशिवाय कारवाफा प्रकल्प, तुलतुली प्रकल्प, पोहरा प्रकल्प, चेन्ना, हळदी व खोब्रागडी प्रकल्प या जागतीक कर्ज सहाय्यीत प्रकल्पाचे काम देखील सुरु करण्यात आले होते. परंतू जंगलव्याप्त क्षेत्रातील जमीन उपलब्ध झाली नसल्यामूळे सध्या या पाचही कामात अडचणी निर्माण झाल्या असून शासनस्तरावर मंजूरीसाठी प्रयत सुरु आहेत. या पाचही प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास 30414 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येईल अशी अपेक्षा आहे.
जलसिंचनाची साधने
जलसिंचन करणा-या विविध प्रकारच्या साधनांनी भिजविले जाणा-या क्षेत्राचा विचार केला असता असे दिसून येते की, या जिल्हयामध्ये नैसर्गिेक पावसाची उपलब्धता ब-याच प्रमाणात असल्यामूळे विहीरीच्या पाण्यावर होणारे ओलीताचे प्रमाण तलाव, कालवे, बोडया इत्यादी साधनांनी होणा-या ओलीताच्या प्रमाणापेक्षा नेहमी बरेच कमी राहात आले आहे. 2000-01 या वर्षी ओलीताखालील निव्वळ क्षेत्र 56311 हेक्टर असून त्यापैकी 3301 हेक्टर तलावा पासुन व उर्वरीत क्षेत्र 53010 हेक्टर क्षेत्र कालवे, बोडया इत्यांदी साधनांनी आलीत करण्यात येते. ओलीताखालील एकूण क्षेत्र 60725 हेक्टर एवढे आहे. जिल्हयात जिल्हापरिषदेची , राज्य शासनाची व खाजगी अशी एकूण 2286 तलाव तसेच 7445 सिंचन विहीरी आहेत. या जिल्हयात दोन मोठे प्रकल्प असुन त्यापासुन सिंचन सुरु असुन लाभ क्षेत्राखालील लागवडी लायक क्षेत्र 52010 हेक्टर इतके आहे. सन 2011-12 मध्ये प्रत्यक्षात 15747 हेक्टर क्षेत्रात ओलीत केलेले आहे.