
प्रभू राजगडकर हे आदिवासी मराठी काव्य परंपरेतील पहिल्या पिढीचे महत्त्वाचे कवी आहेत. 1983 साली भुजंग मेश्राम यांच्या सहकार्याने त्यांनी मोहोळळ या आदिवासी कवींच्या पहिल्या प्रतिनिधिक काव्यसंग्रहाचे संपादन केले असून अलीकडच्या काही कविता आणि गोंगलू ही त्यांची काव्यपत्रकेही प्रसिद्ध आहेत. डॉ. अशोक पळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात प्रभू राजगडकर यांच्या कवितांचा एम. फिल साठीही अभ्यास केला गेला आहे. आगामी निवडुंगाला आलेली फुलं हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. राजगडकर हे प्रशासकीय अधिकारी असून साहित्य व सामाजिक चळवळींशी त्यांचे नाते आहे. येथून पुढे हा काव्यसंग्रह चंद्रपुरातील जागरूक प्रकाशनाने प्रकाशित केला. राजगडकर यांचा येथून पुढे हा कवितासंग्रह संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या एम.ए. मराठी प्रथम वर्ष साठोत्तरी साहित्य प्रवाह या पत्रिकेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.