शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

विद्यार्थ्यांची हजेरी घेणाऱ्या गुर्जींना लावावी लागताहे पोलिस ठाण्यात हजेरी!

Tuesday, 11th August 2015 07:36:31 AM

 

गडचिरोली, ता.११:  गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत २०१३ मध्ये झालेल्या २२० शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या रद्द केल्याप्रकरणी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर आजपासून  ७३ शिक्षकांना गडचिरोली पोलिस ठाण्यात बयाणासाठी बोलावणे सुरु झाले आहे. यामुळे दररोज शाळेत विद्यार्थ्यांची हजेरी घेणाऱ्या "गुर्जी"ची हजेरी आता पोलिस घेणार आहेत.

गडचिरोली जिल्हा परिषदेने २०१३ मध्ये २२० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र या बदल्यांमध्ये अनियमितता असल्याचा ठपका ठेवून प्रशासनाने यंदा या बदल्या रद्द केल्या. या बदल्यांना शिक्षकांनी उच्च न्यायालयातून स्थगनादेश मिळविला. परंतु बदली झालेल्या उपरोक्त २२० शिक्षकांपैकी तब्बल ७३ शिक्षकांच्या बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी जून महिन्यात गडचिरोली पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार केली. पुढे पोलिस उपनिरीक्षक श्री.मुनगेलवार यांनी या प्रकरणाचा तपास सुरु करुन ६ व ७ जुलै रोजी जिल्हयातील सर्व संवर्ग विकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविले. या पत्रात बदल्यांमध्ये अनियमितता असलेल्या संबंधित शिक्षकांना गडचिरोली पोलिस ठाण्यात नियोजित तारखेस बयाण नोंदविण्यासाठी पाठवावे, असे म्हटले होते. परंतु बहुतांश बीडीओंनी पोलिसांच्या या पत्राची दखल घेतली नाही. त्यामुळे पोलिसांनी २९ जुलै रोजी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना पुन्हा पत्र लिहिले. त्यानंतर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी संबंधित बीडीओंची कानउघाडणी करुन "त्या" शिक्षकांना पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्याचे बजावले. त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळया पंचायत समित्यांमधील शिक्षकांना बयाणासाठी तारखा निश्चित केल्या. आज जवळपास २० शिक्षकांचे बयाण नोंदविण्यात आले. आणखी १६, १८, २० व २५ ऑगस्ट रोजी उर्वरित शिक्षकांचे बयाण नोंदविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक श्री.मुनगेलवार यांनी दिली.

विशेष म्हणजे, ७३ शिक्षकांच्या बदल्याच बोगस असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या बदल्या करताना तत्कालिन काही पदाधिकारी व शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व रितीरिवाज धाब्यावर बसविले होते. यात बहुतांश जणांनी मोठी कमाईही केली होती. या प्रकरणात शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. आता ते पुन्हा रुजू झाले आहेत. बदली झालेल्या बहुतांश शिक्षकांची "नस्ती" जिल्हा परिषद कार्यालयातून गायब आहे. अनेक जणांचे बदल्याचे आदेश बोगस असून, त्यांंचे जावक क्रमांकही बनावट आहेत. त्यामुळे चौकशीअंती संबंधित शिक्षक दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक श्री.मुनगेलवार यांनी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HXHRJ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना