/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता, २४: एकीकडे मोठमोठया कंपन्यांना गडचिरोली जिल्हयात आणून पोलिस संरक्षणात आदिवासींना रोजगार देण्याचे प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे मात्र हेच पोलिस आदिवासींना वेठीस धरत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. यासंदर्भात लोकबिरादरी प्रकल्पातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व लेखक विलास मनोहर यांनी लोकबिरादरी प्रकल्पात घडलेल्या ताज्या घटनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना खुले पत्र लिहिले असून, त्यात त्यांनी "आदिवासी मुलांवर मारपीट, बंदुकांचेच संस्कार करणार का?" असा सवाल करुन पोलिसांची दडपशाही चव्हाटयावर आणली आहे.
भामरागड, एटापल्लीसारख्या दुर्गम भागातील आदिवासी अजूनही नक्षलवादी आणि पोलिस यांच्या कैचीत सापडले आहेत. दररोज जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आदिवासींना पावलोपावली भय दिसत आहे. मात्र, सरकारने आदिवासींच्या मागासलेपणाला केवळ नक्षलवादीच जबाबदार असल्याचा (गैर)समज करुन घेऊन त्यांच्या बंदोबस्तासाठी मोठी फौज तैनात केली आहे. त्यावर कोटयवधी रुपयेही खर्च केले जात आहेत. ही फौज नक्षल्यांचा शोध घेण्यासाठी असली, तरी नक्षलवादी सापडले नाही, तर "पकडा आदिवासींना" असे कृत्य करीत असते. त्यामुळे सर्वसामान्य आदिवासींचे जिणे हराम झाले आहे. जेथे पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांनी आदिवासींच्या मुलांवर मानवी मूल्य रुजविण्याचे संस्कारकेंद्र सुरु केले, त्याच लोकबिरादरी प्रकल्पात येऊन पोलिसांनी बालमनावर कशी दहशत बिंबविण्याचा प्रयत्न केला, याचा प्रत्यय आल्यानंतर विलास मनोहर यांना राहवले नाही आणि त्यांनी थेट मुख्यमत्र्यांना खुले पत्र लिहिले. हे पत्र आम्ही येथे जसेच्या तसे प्रकाशित करीत आहोत.
- मा. विलास मनोहर यांचे मा. मुख्यमंत्री यांना खुले पञ
मा. मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य.
स.न.वि.वि.
आपणांस पत्र पाठविले तर नक्कीच पोच येईल. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिली आहे, असे आश्वासनही दिसेल; पण कारवाई कोण करणार ? कोणावर करणार? कशासाठी करणार? मला कसलीच अपेक्षा नाही.. कारण सवयीचा परिणाम!
मी आणि माझी पत्नी गेली ४० वर्षे आदिवासींसोबत भामरागड भागात राहत आहोत. इतरांनाही कळावे म्हणून खुले पत्र लिहित आहे. कदाचित आपल्यापर्यंत पोहोचेल.
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाने आदिवासींच्या आग्रहावरुन, हेमलकसा पासून २२ कि.मी. अंतरावर छत्तीसगड सीमेवर नेलगुंडा या गावी ५ मे २०१५ पासून ‘ साधना विद्यालय ‘ सुरु केले आहे. नेलगुंडा, गोंगवाडा, महाकापल्ली, कवंडे, मिडदापल्ली, परयानार व मोरमेटा या गावांतील ५९ मुले शाळेत बालवाडी, पहिली व दुसरीचे शिक्षण घेत आहेत. दोन आदिवासी शिक्षक, लोक बिरादरी प्रकल्पातील एक शिक्षिका या शाळेत काम करत आहेत आणि त्यांच्यासोबत सातारा, पुणे, मुंबईहून आलेले उच्चशिक्षित तरुण-तरुणी समाजकार्य म्हणून सहभागी झाले आहेत.
आज दि. २१ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शाळा सुरु असताना गावाकडून दहा – बारा बंदुकीच्या गोळ्या उडल्याचा आवाज आला. आवाज फक्त एकदाच आला. काही वेळाने गावाकडून लोकांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. शाळेतील मुले एकदम शांत झाली. त्यावेळी माझी पत्नी इतर तीन शिक्षिकांसोबत तेथे होती.“ ताई s ताई ss ” असा ओरडण्याचा आवाज आला म्हणून माझी पत्नी बाहेर येऊन पाहू लागली. एका आदिवासीला दोन पोलिस मारहाण करत होते. सध्या शाळेत बांधकाम चालू आहे. तो आदिवासी तरुण बांधकाम मिस्त्री आहे हे ओळखून “ त्याला मारु नका, तो शाळेत काम करतो “ असे तिने सांगितल्यावर मारणे थांबले; पण त्याला ओढत ते घेऊन गेले. माझी पत्नी परतत असताना तिने पाहिले की चार – पाच सीआरपीएफ जवान शाळेतून हातांत बंदुका, रायफल घेऊन येत आहेत. सर्व लहान आदिवासी मुले त्यांच्याकडे भेदरलेल्या नजरेने पहात आहेत. बालवाडीच्या दोन मुली रडत आहेत, बाकी शिक्षिकेच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी पत्नी त्यातल्या एकाला म्हणाली, “ आप स्कूलसे क्यों जा रहे हो? रास्ता तो बाहर से है ” त्याने मग्रुरीत उत्तर दिले, “ हम हमारा काम कर रहे है, आप आपका काम करना “ तो चालला गेला. मागूनचा विचारता झाला, “ यह स्कूल है क्या? किस का है? “ जाता जाता गुटख्याची पिचकारी टाकून गेला. माझी पत्नी परत मुलांकडे आली.
मुले भेदरलेल्या नजरेने पहात होती. त्यांच्या कविता, बडबड गीते, आरडाओरडा केव्हाच बंद झाला होता. त्यांच्या कानावर गावातील त्यांच्या काका – मामांचे रडणे – ओरडणे पडत होते. त्यांच्यापासून दहा – बारा फूटांवर शाळेतून जाणारे बंदूकधारी जवान दिसत होते. इतर वेळी शाळेत नवीन कोणी आले तर आनंदाने उभे राहून तारसूरात “ गुड मॉर्निंग “ म्हणणारी रोजची हिच निरागस आदिवासी मुले का? असा प्रश्न पडत होता. मुले शाळा सुटेपर्यंत तशीच होती. काय विचार करत असतील? त्या नाजूक हळव्या मनांत काय चालले असेल? ही आपल्या महान भारताची भावी पिढी नाही का?
मुख्यमंत्री साहेब, ही घटना समजून घ्या. कोणाविरोधात माझी तक्रार नाही. या घटनेत कोणतीच बाजू मला घ्यायची नाही. पण एकीकडे जन-जागरण मेळावे घेऊन आदिवासींना वस्तू वाटप केले म्हणून फोटो छापून आणावयाचे, दुसरीकडे विनाचौकशी रस्त्यात आदिवासींना मारझोड करावयाची, हे बरोबर आहे का? मग याचे पण फोटो छापून आणा ना! इतरांना दोन्ही दिसू द्या. आदिवासींना रोजचेच आहे. कसा तुमच्यावर विश्वास ठेवावा?
मुख्यमंत्री साहेब, शाळेपासून १०० मीटर अंतरापर्यंत तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे असा कायदा आहे. अर्थात, कायदा नावापुरता आहे. तसा शाळेच्या आवारात व आजुबाजुला पोलिस कारवाईला बंदी करणारा कायदा करता येईल का?
बघा, यात पक्षाचा प्रश्न येत नाही कारण सर्व आमदार बालवाडी शाळेत गेलेले आहेत. प्रत्येकाने आठवावे, लहानपणीचे अनुभव! एक वेळ आपण चांगले विसरतो पण वाईट घटना मनावर कोरलेल्या राहतात. आज या निरागस आदिवासी लहान मुलाच्या मनाचा विचार आपण करणार आहोत का ?
चला, आपण गृहीत धरु की नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. तर मग पोलिसांनी शाळेतून येणे चुकीचे नाही तर मूर्खपणाचे होते. समजा, आणखी गोळीबार झाला असता आणि गोळया मुलांना लागल्या असत्या तर? ही नुसती कल्पना नाही; जरा आठवा, दोन वर्षांपूर्वी अशाच एक नक्षलकारवाईत कोरची गावाकडे हॅण्डग्रेनेड स्फोटात दोन आदिवासी विद्यार्थी सापडले होते.
आदिवासींना आपण आणखी दूर तर लोटत नाही ना ? या नवीन आदिवासी लहान मुलाच्या मनाचे काय ?
या वाढीच्या वयात आपण त्याच्यावर मारपीट, बंदूका हेच संस्कार करणार आहोत का ? ‘ शस्त्राने अधिकार, रुबाब
येतो’ हेच घेऊन पुढची पिढी निर्माण करावयाची का?
ही तक्रार नाही. कारण त्याने आधीच शिक्षिकेला सुनावले आहे, “हम हमारा काम कर रहे है, आप आपका काम करो.” सर्व जण जात, धर्म, पक्ष विसरुन या घटनेकडे एक शाळेतील बालक म्हणून पाहतील का?
- विलास मनोहर