/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
सोमनूर .. एक विलक्षण अनुभव..
दोन खळाळते प्रवाह वेगाने सरकत एक बिंदूला एकत्र येतात आणि आपसात विरुन एका नव्या प्रवाहाला जन्म देतात आणि हा प्रवाह मग अधिक वेगाने पुढे धावायला लागंतो, असा प्रवाह आणि त्याचा धडकी भरायला लावणारा आवाज पाण्याची शक्ती काय असते याची अल्पशी जाणीव करुन द्यायला पुरेसा आहे. महाराष्ट्र राज्याची सिमा जेथे संपते तेथे एका बाजूला नव निर्मित तेलंगाणा आणि दुस-या बाजूला छत्तीसगडच्या डोंगररांगा आणि स्थळ अर्थातच गडचिरोली जिल्हयाचं टोक असणारं सोमनूर आणि एकत्र येणा-या या दोन नद्या अर्थातच इंद्रावती आणि गोदावरी या संगमानंतर इंद्रावती गोदावरीत अंतर्धान पावते आणि पुढे गोदावरीचा प्रवाह सागराच्या ओढीने धावायला लागतो.
नाशिकला ब्रम्हगिरीच्या पर्वत रांगांमध्ये थेंब -थेबांने उगम पावणारी गोदावरी संपूर्ण राज्याचा प्रवास करत मार्गात अनेक नद्यांना आपल्या प्रवाहात सामिल करुन घेत इथवर येते. इथं तिचं पात्र अतिशय विस्तीर्ण आणि प्रवाह देखील पट्टीच्या पोहणा-यालाही धडकी भरवणारा असाच आहे.
बारामाही वाहणा-या नद्यांनी संपन्न अशा या गडचिरोली जिल्हयाचं भूषण म्हणता येतील अशा अनेक संगमांचा हा जिल्हा राज्याच्या सिमा अधोरेखित करणा-या या संगमाच्या काही किलोमीटर आधी विस्तीर्ण अशा वैनगंगा आणि गोदावरीचा संगम होतो. दुस-या बाजूने येणारी इंद्रावती भामरागड जवळ आपल्या प्रवाहात पर्लकोटा आणि पामूलगौतम नदीला सामावून घेते तो त्रिवेणी संगम. ही सर्व ठिकाणं पर्यटकांना पर्वणी ठरणारी अशीच आहेत.
सोमनूर हे गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा या तालुका मुख्यालयापासून 50 किमी अंतरावर असणारं छोटं गाव आहे. इथं देखील जुने सोमनूर आणि नवीन सोमनूर अशा दोन गावांमधून आपण या संगमापर्यंत पोहचतो. सिरोंचा तालुका मुख्यालयाचे गडचिरेाली पासून असणारे अंतर 211 किमी इतके आहे.
रस्त्याने जातांना उंच- उंच अशी माडाची झाडं आसमंतात दिमाखाने मिरवताना दिसतात. हा भाग महाराष्ट्राचा सिमेवरचा भाग आहे. यामळे इथली कौलारु घरांची बसकी रचना आपणास लगतच्या तेलंगाणा राज्यात असल्याचा भास करुन देतात. या भागात आंध्रशैलीची पूर्ण छाप असून अर्धी वस्ती तशीच आहे. आणि येथे सर्वाधिक बोलली जाणारी भाषा देखील तेलगूच आहे.
इथं भेटीचा योग अगदीच योगा-योगाने कार्तिक पौर्णिमेला आला सर्व गावांमध्ये या दिवशी दिव्यांच्या दिवाळीची लगबग सुरु होती. हॅपी दिवाळी संदेशासह दारोदारी रंगलेल्या रांगोळया आणि तोरणांनी सजवलेली घरं वेधून घेत होती.
हा भाग नद्यांनी वेढलेला असल्याने येथील जीवनशैलीवर त्याचा चांगलाच प्रभाव पडलेला आपणास दिसतो. येथील अन्नपदार्थात मासे आणि झिंगे यांचा मुबलक वापर होतो. या ठिकाणी गोदावरीच्या पात्रात सापडणारे झिंगे आकाराने खूप मोठे आहेत. त्याची मागणी केवळ याच भागात नाही तर इतरत्रही असते. रसिक खवैय्ये केवळ झिंग्यांची मेजवानी घेण्यासाठी इथं भेट देतात हे उल्लेखनीय म्हणावे लागेल.
या भागात शेती देखील आदर्श शेती या प्रकारात घ्यावी लागेल सर्व ठिकाणी आपणास शेतांना बांबूचे कुंपण घातलेले आपणास दिसते. यामळे जनावरांमुळे पिकांचे होणारे नुकसान रोखले जाते. पाण्याची उपलब्धता असल्याने केवळ एक हंगामी शेतीवर इथं थांबत नाहीत आणि एकाच पध्दतीचे पिकही येथे घेतले जात नाही. धानाच्या शेतालगत ज्वारी आणि कापूस यांची शेती आपणास दिसते.
धानाच्या जोडीला कपाशी, ज्वारी, तंबाखू, मिरची, तसेच मका अशी मिश्र स्वरुपाची शेती आपणास दिसते दाळवर्गीय पिकांमध्ये इथे तूरीची लागवड देखील मोठया प्रमाणात होते. या ठिकाणी ठेक्याने शेतीकरणारे अनेक शेतकरी लगतच्या तेलंगाणामधून येतात.
सोमनूरला येण्यासाठी मुंबईहून नागपूर आणि गडचिरोली मार्गे येता येते. गडचिरोली हे नागपूरपासून 180 किमीटर अंतरावर आहे. आणि गडचिरोलीपासून आलापल्ली मार्गे सिरोंचा हे 215 किमी अंतर आहे. सिरोंचाहून असरअली मार्गे 50 किमी अंतरावरील सोमनूर पर्यंत आपणास पोहाचता येईल. या भागास अतिदुर्गम भागापैकी एक म्हणून ओळखले जाते. सायंकाळी 6 नंतर येथे जाण्यासाठी आणि येथून परतण्यासाठी एस.टी.बस उपलब्ध नाही या पार्श्वभूमीवर सिरोंचा येथे मुक्काम करणे श्रेयस्कर ठरते.
गडचिरेाली जिल्हयात असणा-या सुंदर अशा ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणून सोमनूरची ओळख आहे. हा भाग आता पर्यटन नकाशावर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. मात्र ख-या पर्यटकांना स्थळ आणि अंतर यांची चिंता नसते अशा सर्वांना सोमनूर सतत खुणावत राहते.