शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

प्रतिबिंब विकासाचे : विशेष लेख

Monday, 25th August 2014 03:05:17 AM

विशेष लेख: 

प्रतिबिंब विकासाचे

26 ऑगस्ट 2014 रोजी  गडचिरोली जिल्हा निर्मितीला 32 वर्ष पुर्ण होत आहेत. या 32 वर्षात जिल्हयाने अनेक स्थित्यंतर अनुभवली आहेत.  कुठल्याही जिल्हयाच्या निर्मितीसाठी 32 वर्षाचा काळ तसा मोठाच आहे. मात्र या काळात गडचिरोली सारख्या जिल्हयाने विकासाची अनेक मन्वंतर पाहली.  संपुर्ण वनाने आच्छादित व आदिवासी जिल्हा म्हणुन या जिल्हयाची ओळख आहे. त्यासोबतच नक्षल प्रभावित जिल्हा अशीही एक ओळख आहे. येथील आदिवासी समाज अतिशय कष्टाळु, मेहनती व विकासाला महत्व देणारा समाज आहे. सर्व समस्यांची सोडवणुक विकासाच्या मार्गानेच होऊ शकते यावर इथल्या आदिवासी बांधवाचा दृढ विश्वास आहे. त्यामुळे जिल्हयाच्या निर्मितीच्या 32 वर्षात या ठिकाणी विकासाची अभुतपूर्व मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. सुरुवातीच्या काळात अतिशय जुजबी निधी असलेल्या जिल्हयात आज सुमारे तीनशे साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजनच्या माध्यमातुन खर्च केला जातो. 

शासनाने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातुन जिल्हयात अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्यात प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, रस्ते विकास, कृषी सिंचन आणि पद भरतीचा उल्लेख करता येईल.  या काळात शिक्षण व आरोग्याच्या सोई सर्व सामान्यापर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाल्याचे दिसुन येते.  जिल्हयात 45 प्राथमिक आरोग्य केंद्र व 376 उपकेंद्र असुन 3 प्राथमिक केंद्राचे बांधकाम नव्याने करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांना मुलभुत सोयी सुविधा पुरविणे हे शासनाचे कर्तव्यच आहे.  प्रत्येक गावात पिण्याचे शुध्द पाणी पुरविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. येथील धान उत्पादक शेतकऱ्यांचा माल साठवून ठेवण्यासाठी जिल्हयात 25 ठिकाणी गोडावुन बांधण्यात आले असुन या वर्षभरात आणखी 28 गोडावुन बांधण्यात येणार आहेत.  यामुळे बाजारपेठेत चांगला भाव मिळण्यापुर्वी धान्य साठविण्याची सोय उपलब्ध होणार आहे. 

कृषि उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना उत्पादनाचे दाम जास्त मिळावे यासाठी श्री पध्दतीने धानाची लागवड, सुक्ष्म सिंचन, दुबार पीक, फळबाग लागवड व यांत्रिकीकरण यावर भर देण्यात आले आहे. सोबतच लाखाची लागवड, रेशिम उत्पादन, ॲपल बोर यासारखी नवीन नवीन उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना आत्मा प्रकल्प अंतर्गत मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन प्रेरित करण्यात येत आहे.  

गौण वन उपज संकलन, साठवणुक व विक्री करुन चांगली  किंमत गडचिरोलीतील वनावर आधारीत लोकांना प्राप्त व्हावे या दृष्टिने जिल्हा प्रशासनाने गौणवन उपज यासाठी किमान मुल्य जाहिर केले आहे. उत्पादन साठवणुकीसाठी 130 ठिकाणी गोडाऊन बांधकाम करण्यात आले आहे. 

कुठल्याही राज्याला व जिल्हयाला कुशल मनुष्यबळाची नेहमीच गरज भासत असते.  गडचिरोली जिल्हयात वनवैभव मोठया प्रमाणात आहे.  येथील आदिवासी समाज अत्यंत कौशल्यप्रधान असाच आहे. त्यांच्या कलागुणांचा उपयोग त्यांच्या अर्थाजनासाठी व्हावा म्हणुन कौशल्य विकास उपक्रम राबविण्यात आला.  यासाठी जिल्हा प्रशासनाने 16 00 पेक्षा जास्त उमेदवारांना प्रशिक्षण दिले.  त्याचा चांगला फायदा आता दिसुन येत आहे. बांबु साहित्यातुन विविध वस्तु बनविण्याच्या कलेला प्रोत्साहन देण्यात आले.  या वस्तु मुंबई-दिल्ली येथील बाजारपेठेत पोहचल्या.  व त्यातुन रोजगाराचे नवे दालन निर्माण झाले. 

वरकरणी अगरबत्ती हा छोटा व्यवसाय दिसत असलातरी या व्यवसायाने येथील गरीब आदिवासींच्या जीवनात मोठा बदल घडवुन आणण्याच्या दिशेने हा व्यवसाय अग्रेसर आहे.  महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी  महिला बचतगट व उत्पादक संघ यांची बांधणी करुन  अगरबत्ती  प्रकल्पाच्या माध्यमातुन एक हजार महिलांना रोजगार उपलब्ध होवून महिला आर्थिकदृष्टया स्वयंपुर्ण झाल्या आहेत. एक हजार महिला म्हणजेच एक हजार कुटूंब .  अगरबत्ती प्रकल्पाची दखल राज्यातील सर्वच लोकांनी घेतल्याचे नमुद करावे वाटते.  नरेगा अंतर्गत 30 लाख मनुष्यदिवस रोजगार निर्मिती करण्यात आली आहे.  

आज गडचिरोली जिल्हा राज्यात वन हक्क कायद्यानुसार जमीनीचे पट्टे वितरण करण्यात प्रथम क्रमांकावर आहे. वैयक्तिक 30 हजार व सामुहिक 1 हजार  पट्टे वाटप करण्यात आले.  संतगाडगे बाबा स्वच्छता अभियानामध्ये देशात आपले राज्य प्रथम क्रमांकावर आहे. ही योजना गेल्या सात वर्षापासुन येथे राबविल्या जात आहे.   तसेच आदिवासी विभागामार्फत विभागीय पातळीची इंग्रजी माध्यमाची शाळा येथे सुरु आहे. जिल्हयात 5 ठिकाणी कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय सुरु करण्यात आले. मानव विकास मिशन अंतर्गत येथील 3 हजार  गरजु विद्यार्थीनीना  सायकल उपलब्ध करुन देण्यात आले.  यावेळी 10 व 12 वीचा निकालात मागच्या वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ झालेली आहे.  

जिल्हयात प्रोजेक्ट गती (गडचिरोली टॅक्सी) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत संवेदनशिल व अतिदुर्गम भागातील आदिवासी व सामाजिकदृष्टया मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांची प्राधान्याने निवड करुन प्रती लाभार्थी अनुदान स्वरुपात रुपये 3 लाख वित्तीस सहाय्याव्दारे तसेच बँकेव्दारा प्रचलीत वाहन कर्जापेक्षा कमी व्याज दराने कर्ज मंजुर करण्यात येत आहे.  38 लाभार्थ्यांना काळी पिवळी टॅक्सी उपलब्ध करुन देण्यात आली असुन किमान 110 बेरोजगारांना याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे बेरोजगारांना हक्काचा रोजगार तसेच दुर्गम भागात वाहतुकीची सुविधा उपलब्ध होत आहे.  प्रतिकुल परिस्थितीतही जिवावर उदार होऊन योजनांची अंमलबजावणी करण्यास कसुर न केल्यामुळेच व सर्वांच्या सहकार्यामुळेच ते शक्य झाले.  

समाधान शिबिर व सुवर्ण जयंती राजस्व अभियानचे माध्यमातुन शासकीय योजनांची माहिती व लाभ ,  विविध प्रकारचे दाखले गावोगांवी शिबीर आयोजित करुन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच भुमि अभिलेख कार्यालयाला 12 नवीन  E T S  मशीन  उपलब्ध करुन देण्यात आल्या . यामुळे जमीनीच्या मोजनिचे प्रकरण संगणकीकृत मशीनव्दारे त्वरीत व सटीक होत आहे. 

32 वर्षाच्या काळात जिल्हयाने प्रगतीचे  व विकासाचे नवनवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख आहेच.  असे असलेतरी प्रशासनाने अतिशय धिराने व नेटाने ही चळवळ मोडण्याचा प्रयत्न केला आहे.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दर्शन घडविण्याचा स्तुत्य उपक्रम पोलीस प्रशासनाने राबविला आहे.  ज्यांनी कधी जिल्हा मुख्यालय पाहीले नाही अशाना महाराष्ट्र दर्शन घडविण्यात आले.  अशा अनेक उपक्रमासह जिल्हा आज विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे.  हा सगळा प्रवास येथील जनतेच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हता.  यापुढेही शासन व प्रशासन जिल्हयाच्या विकासासाठी कटीबध्द असुन जनतेचे असेच सहकार्य यापुढेही लाभेल यात शंका नाही.  जिल्हा वासियांना जिल्हयाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा !

 

श्री. रणजीत कुमार 

जिल्हाधिकारी, गडचिरोली जिल्हा


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6AM0H
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना