शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन नवजात बालकांचा मृत्यू

Saturday, 20th May 2017 06:35:56 AM

 

गडचिरोली, ता.२०: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील दहा तासांत दोन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली असून, आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांत प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.

अहेरी येथील रिजवाना आरिफ शेख व चंद्रपूर जिल्ह्यातील मालडोंगरी येथील दुर्गा समर्थ या दोन महिलांना प्रसूतिकरिता गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे दोघींच्या नवजात बालकांचा मृत्यू झाला. रिजवाना शेख या महिलेला काल १९ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या वेदना वाढल्यामुळे प्रसूतीची वेळ जवळ आली होती. त्यामुळे रिजवानाच्या कुटुंबीयांनी डॉ.नंदकुमार माळाकोळीकर यांना माहिती दिली. परंतु डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य न बघता प्रसूतीकडे कानाडोळा केला. अखेर संध्याकाळी रिजवाना वेदनांनी विव्हळत असताना डॉ.माळाकोळीकर यांनी तिची प्रसूती केली. प्रसूतीनंतर बाळ पोटातच दगावल्याचे निदर्शनास आले. डॉ.माळाकोळीकर यांनी वेळीच प्रसूती केली असती तर बाळ सुखरुप बाहेर आले असते. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळ दगावला, असा आरोप रिजवानाच्या नातेवाईकांनी केला.

दुसरी घटना दुर्गा समर्थ या महिलेच्या बाबतीत घडली. दुर्गा समर्थ हिलादेखील कालच प्रसूतिकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रसूतिनंतर काही क्षणातच तिचेही नवजात बाळ दगावले. या दोन्ही घटनांबाबत नागरिकांनी रुग्णालयाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

गंभीर प्रकरण असतानाही लोकप्रतिनिधी असंवेदनशीलच: भावना वानखेडे  

जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे महिलांच्या प्रसूतिदरम्यान दोन नवजात बालकांचा बळी गेला. याआधीही येथील सामान्य रुग्णालयात अनेक बालकांचे हकनाक बळी गेले आहेत. आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार सुरु असताना स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष भावना वानखेडे यांनी केला. जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, पुरेशी यंत्रसामग्री येथे उपलब्ध नाही. डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रुग्णांप्रती वर्तणूक चांगली नाही. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील समस्यां येत्या आठवडाभरात सोडविल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा भावना वानखेडे यांनी यावेळी दिला. 

प्रकरणाच्या चौकशीकरीता चौकशी समिती गठित करणार : डॉ.अनिल रुडे 

नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठित करणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे यांनी दिली. तत्काळ चौकशी करुन यासंदर्भाचा अहवाल सादर करुन  दोषींवर योग्य कारवाई करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाचा अभाव व कामाचा अतिरिक्त ताण यामुळे यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
PG45D
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना