मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज: जिल्हाधिकार्‍यांची माहिती

Monday, 15th September 2014 06:09:47 AM

 
गडचिरोली, ता़१५
पुढील महिन्याच्या १५ तारखेला होणार्‍या विधासभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, तिन्ही मतदारसंघातील ८७२ मतदान केंद्रांवर निवडणूक घेण्यात येणार आहे़ सुमारे ७ लाख २८ हजार ११६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रणजितकुमार यांनी आज (ता.१५) पत्रकार परिषदेत दिली.

श्री़ रणजितकुमार यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली व अहेरी हे तीन मतदारसंघ आहेत. या तिन्ही मतदारसंघात  १ ज़ुलै २०१४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार ७ लाख २८ हजार ११६ मतदारांची नोंद करण्यात आली आहे़ यामध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्रात २ लाख ३७ हजार ८०२ मतदार आहेत. यात १ लाख २१ हजार ९४४ पुरूष मतदार व १ लाख १५ हजार ८५८ महिला मतदारांचा समावेश आहे.  गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे २ लाख ७५हजार ८४३ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ४२ हजार ४५५ पुरूष मतदार व १ लाख ३३ हजार ३८८ महिला मतदारांचा समावेश आहे. अहेरी मतदारसंघात एकंदरीत २ लाख १४ हजार ४७१  मतदार आहेत. यामध्ये १ लाख १० हजार ३३९ पुरूष, तर १ लाख ४ हजार १२३ महिला मतदारांचा समावेश आहे. नाव नोंदणीसाठी मतदारांना आणखी संधी देण्यात येणार असल्याने मतदारांच्या संख्येत वाढ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले़

निवणुकीसाठी एकंदरीत ८७२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून आरमोरी विधानसभा मतदारसंघात  २६६, गडचिरोली मतदारसंघात ३२०, तर अहेरी मतदारसंघात २८६  मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील नक्षल्यांच्या हिंसक कारवाया लक्षात घेता निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना आखल्या आहेत़ जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. अतिसंवेदनशिल मतदान केंद्रावर मतदान पथके पाठविण्यासाठी तसेच आणिबाणीच्या काळात तातडीने मदत पोहचविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाणार आहे.
विधानसभा निवडणूक सुरळीतरित्या पार पाडण्यासाठी आरमोरी, गडचिरोली व अहेरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर ४५०० अधिकारी व कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. तसेच कर्मचार्‍यांना ने-आण करण्यासाठी २९१ वाहनांचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये एसटी बसेस व खासगी वाहनांचा समावेश राहील.
विधानसभेची निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाची मर्यादा २८ लाख रूपये ठरवून दिली आहे. उमेदवाराने आपल्या निवडणूक खर्चाचे स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. निवडणुकीचा खर्च नगदी अथवा धनादेशाने करावा. निवडणूक खर्चाची रक्कम २० हजारापेक्षा अधिक देय करावयाची असल्यास ती धनादेशाद्वारे करणे बंधनकारक राहील.उमेदवाराला प्रत्येक दिवशीचा खर्च  निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे, असेही जिल्हाधिकारी श्री़रणजितकुमार यांनी स्पष्ट केले़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HX0KP
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना