गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली जिल्हा परिषदेवर राकाँ-काँग्रेसची सत्ता

Sunday, 21st September 2014 06:06:30 AM

 
गडचिरोली, ता़२१
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज २१ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्टÑवादी काँग्रेसचे परशुराम कुत्तरमारे, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या पोरेड्डीवार गटाचे जीवन पाटील नाट विराजमान झाले़ कुत्तरमारे यांनी भाजपा समर्थीत वर्षा कौशिक यांचा ६ मतांनी, तर जीवन नाट यांनी अतुल गण्यारपवार यांचा ८ मतांनी पराभव केला़

गडचिरोली जिल्हा परिषदेत अडीच वर्षापूर्वी राष्टÑवादी काँग्रेसने भाजपा व पूर्वाश्रमीच्या युवाशक्ती संघटनेशी युती करुन सत्ता प्राप्त केली होती. तेव्हा राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम अध्यक्षपदी व भाजपाचे डॉ. तामदेव दुधबळे उपाध्यक्षपदी विराजमान झाले होते. मात्र, त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आज निवडणूक घेण्यात आली़ यावेळी समीकरण वेगळे होते.  ५१ सदस्यीय गडचिरोली जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १३, राष्ट्रवादी काँग्रेस १०, भाजप ८, पूर्वाश्रमीच्या युवाशक्ती संघटनेचे ७, नाग विदर्भ आंदोलन समितीचे ४, आदिवासी विद्यार्थी संघाचे ३, शिवसेना २, भाकप १ व ३ अपक्ष सदस्यांचा समावेश आहे़ 

आज झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीत राकाँ, काँग्रेस व सुरेंद्रसिंह चंदेल यांच्य गटात आघाडी झाली, तर भाजप, नाविस, आविस, राकाँचा अतुल गण्यारपवार गट आणि शिवसेनेची युती झाली होती़ मात्र, भाजपाच्या जयमाला पेंदाम, होमराज आलाम व पार्वताबाई कन्नाके या तीन जि. प. सदस्यांनी भाजपा उमेदवार वर्षा कौशिक यांना मतदान न करता राष्ट्रवादीचे उमेदवार परशुराम कुत्तरमारे यांना मतदान केले़ तसेच शिवसेनेच्या लक्ष्मी मने आणि कुसूम रणदिवे यांनीही कुत्तरमारे यांना मतदान केले़ कुत्तरमारे यांना राकाँच्या ६, काँग्रेसच्या ९, चंदेल गटाच्या ५, शिवसेनेच्या २, भाजपाच्या ३, भाकपाच्या १ व २ अपक्ष अशा एकूण २८ सदस्यांनी मतदान केल्याने ते विजयी झाले़ दुसरीकडे, भाजपाच्या उमेदवार वर्षा कौशिक यांना भाजपाच्या ५, अतुल गण्यारपवार गटाच्या ४, नाविसच्या ४, आविसंच्या ३, काँग्रेसच्या ४, अपक्ष नामदेव सोनटक्के व पूर्वाश्रमीच्या युवा शक्तीच्या वर्षा कौशिक अशा २२ सदस्यांनी मतदान केले़ वर्षा कौशिक यांचा ६ मतांनी पराभव झाला़ 
राकाँ-काँग्रेस-चंदेल गटाच्या आघाडीकडून उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या पोरेड्डीवार गटाचे जीवन नाट, तर भाजप, गण्यारपवार गटाकडून अतुल गण्यारपवार रिंगणात होते़ मात्र, जीवन नाट यांनी अतुल गण्यारपवार यांचा ८ मतांनी पराभाव केला़ जीवन नाट यांना २८, तर अतुल गण्यारपवार यांना २० मते मिळाली़ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वर्षा कौशिक यांना मतदान करणारे भाजपाचे यशवंत धुळसे व अपक्ष सदस्य म्हणून नोंद असलेले मात्र अलिकडेच भाजपात गेलेले नामदेव सोनटक्के हे दोघे उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहिले़ त्यामुळे वर्षा कौशिक यांच्यापेक्षा अतुल गण्यारपवार यांना दोन मते कमी मिळाली़  विशेष म्हणजे, पूर्वाश्रमीच्या युवाशक्ती संघटनेच्या जिल्हा परिषद सदस्य पल्लवी लाडे या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरहजर राहिल्या़
एकेकाळी जिल्हा परिषदेवर एकहाती वर्चस्व गाजविणारे बंडोपंत मल्लेलवार मागील वर्षभरापासून तुरुंगात आहेत़ नक्षल्यांना मदत केल्याच्या संशयावरून ते न्यायालयीन कोठडीत आहेत़ मात्र, अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन ते गडचिरोलीत आले़ दुपारी सव्वाबारा वाजता पोलिस बंदोबस्तात त्यांची एन्ट्री झाली़ त्यांना बघण्यासाठी व भेटण्यासाठी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली़ कार्यकर्त्यांना भेटून बंडोपंतही गहिवरले होते़ त्यांची हजेरी हाही आज चर्चेचा विषय ठरला़ 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
S9T1X
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना