शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

२६ पैकी १५ ग्रामपंचायतीचे सरपंच भाजपचे-खा.अशोक नेते

Tuesday, 17th October 2017 05:04:16 AM

गडचिरोली, ता.१७: काल पार पडलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २६ पैकी १५ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच निवडून आल्याचा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष खा.अशोक नेते यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

खा.अशोक नेते म्हणाले, यावेळी प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडून द्यावयाचा होता. काल जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. मात्र, अहेरी तालुक्यातील किष्टापूर येथील सरपंच व सदस्य अविरोध निवडून आले. हे सर्वजण भाजपचे आहेत. कोरची तालुक्यातील बोगाटोला येथे केवळ सदस्य अविरोध निवडून आले. त्यातील ५ पैकी ३ सदस्य भाजपचे आहेत. बोगाटोला येथे सरपंचपदाची निवडणूक झाली नाही. उर्वरित २४ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच निवडून आले, तर दोन ठिकाणी भाजप समर्थित सरपंच विजयी झाले. या निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघाला ३, तर ग्रामसभा समर्थित २ अपक्ष उमेदवारांनी विजय मिळविला. मात्र, काँग्रेसला एकाही ठिकाणी विजय मिळवता आला नाही, असे खा.नेते यांनी सांगितले.

कर्जमाफी ऐतिहासीक

राज्य सरकारने ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे. आजवरच्या सरकारांनी ८ हजार कोटीपेक्षा जास्त कर्जमाफी केली नाही. त्यामुळे राज्य सरकारने केलेली कर्जमाफी ऐतिहासीक आहे. या कर्जमाफीमुळे राज्यातील ३९ लाख, तर गडचिरोली जिल्ह्यातील ३० हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे जाहीर केले आहे. त्याअनुषंगाने उद्या(ता.१८) पहिल्या टप्प्यात दीड लाखांपर्यंत कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानुषंगाने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दीड लाखांहून अधिक कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. उद्या मुंबईतही एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ३ शेतकऱ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती खा.अशोक नेते यांनी दिली.

पत्रकार परिषदेला आ.डॉ.देवराव होळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत वाघरे, शहराध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे. डॉ.भारत खटी, रमेश भुरसे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, अनिल पोहनकर, मुक्तेश्वर काटवे, प्रकाश अर्जुनवार, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद अली उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
YRS21
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना