शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देणार:अम्ब्रिशराव आत्राम

Wednesday, 18th October 2017 04:43:26 AM

गडचिरोली, ता.१८: केवळ कर्जमाफीने शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नाहीत. शेतकऱ्याने स्वबळावर उभे राहावे यासाठी त्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देऊ, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास व वनराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, प्रभारी जिल्हाधिकारी अशोक चौधरी, सहायक जिल्हाधिकारी इटनकर, नगराध्यक्षा योगीता पिपरे, उपनिबंधक सीमा पांडे प्रामुख्याने उपस्थित होते. 

अम्ब्रिशराव आत्राम पुढे म्हणाले, निसर्गाच्या अवकृपेमुळे पिकांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल, असे सांगितले होते. त्या अनुषंगाने सर्व ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचा राज्यस्तरावरील शुभारंभ मुंबई येथे पार पडला. शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या रकमेचा सदुपयोग करावा, असे आवाहन करुन श्री.आत्राम म्हणाले की, हा जिल्हा उद्योगविरहीत असल्याने व शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आपण सिंचनासाठी भरीव तरतूद केली असून, बंद पडलेल्या कोटगल बॅरेजचे कामही पुन्हा सुरु केले आहे, असेही ते म्हणाले.

खा. अशोक नेते म्हणाले की, कर्जमाफी हाच एकमेव उपाय नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना सिंचन सुविधा, बाजारपेठ, पीक विमा व चांगले रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करु. याप्रसंगी आ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे व योगीता भांडेकर, योगीता पिपरे यांचीही भाषणे झाली.

याप्रसंगी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या २४ शेतकऱ्यांना पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक सीमा पांडे यांनी केले. संचालन सहायक निबंधक श्री.पाटील यांनी केले. 

                                   


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
I4M10
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना