गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नक्षल्यांनी आत्मसमर्पण करुन मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे-हंसराज अहीर

Monday, 23rd October 2017 05:19:49 AM

गडचिरोली,ता.२३: गडचिरोली जिल्हा आदिवासीबहूल जिल्हा असून जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे. येथील आदिवासींचा विकास  नक्षल चळवळीमुळे प्रभावीत झाला आहे. नक्षल्यांमुळे शासनाच्या योजना आदिवासींपर्यंत पोहचण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आदिवासींच्या प्रगतीत अडसर न ठरता नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले. 

केद्रीय रिझर्व्ह पोलिस बल १९२ बटालियनच्या परिसरात आयेाजित सिविक अॅक्शन प्रोग्राम २०१७-१८ च्या उपक्रमाचे उद्घाटन श्री.अहीर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाचे उप महानिरीक्षक राजकुमार, सी.टी. शेखर,  प्रभारी जिल्हाधिकारी अशोक चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उप पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, प्रभाकर त्रिपाठी उपस्थित होते. 

हंसराज अहीर पुढे म्हणाले, आज जिल्हयात प्रतिकूल परिस्थिती असतानाही शासकीय योजना लाभार्थींच्या दारापर्यंत पोहचविण्यात येत आहेत. मात्र, नक्षल्यांमुळे योजनांचा लाभ घेण्यात नागरिकांना अडचणी येत आहेत. या योजनांची अंमलबजावणी करुन नागरिकांचे जीवन सुकर करण्यासाठी जिल्ह्यात पोलिस व केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. पोलिसांची जी शक्ती सीमेवर खर्च व्हायला पाहिजे, ती आपल्याच लोकांशी भांडण्यात खर्च होत आहे. त्यामुळे नक्षल्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन जिल्हयाच्या विकासास गती देण्यास सहकार्य करावे. नक्षलवाद्यानी येथील प्रशासन व दुर्गम भागातील नागरिकांना वेठीस धरण्यापेक्षा त्यांनी सीमेवर जाऊन देश रक्षणाचे कर्तव्य बजावावे, असे आवाहन श्री.अहीर यांनी केले. 

युवकांनी नोकरीच्या शोधात न भटकता आपल्याच गावात परपंरागत व्यवसायासोबत कुक्कुटपालन, बकरी पालन, दुग्ध व्यवसाय, शिलाई मशिन, संगणकावरील कामे आदींचे प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार करावा व आपला विकास आपणच करावा, असेही ते म्हणाले. स्वयंरोजगारासाठी शासन अनुदान तत्त्वावर इच्छुकांना साधनसामग्री उपलब्ध करुन देत आहे. तसेच कौशल्य विकास योजनेंतर्गत मोठया प्रमाणात युवकांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचाही युवक, युवतींनी लाभ घ्यावा. आज शहरातून भाजीपाला, दुध्‍, मांस, अडी खेडयात जाते. याऐवजी खेडयात या वस्तू उत्पादित होऊन शहरात विक्रीसाठी याव्यात यासाठी शासन कटीबध्द आहे. आज देशात प्रथमच येथे सिविक अॅक्शन प्रोग्राम २०१७-१८ या उपक्रमाचा शुभारंभ करीत आहे. प्रत्येकाला शासन  २०२२ पर्यंत घर उपलब्ध करुन देणार आहे. तसेच प्रत्येक युवक रोजगार करुन आपला चरितार्थ चालवेल अशी ताकद आमच्या युवकात तयार करण्यासाठी या उपक्रमाचा निश्चित फायदा होणार आहे, असेही ते म्हणाले. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलिस उप महानिरीक्षक श्री.राजकुमार यांनी प्रास्ताविकातून माहिती सादर केली. आतापर्यंत १६५ परिवारांची लाभार्थी म्हणून निवड झाली असून त्यातून ९५० युवकांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी लाभार्थींना कुक्कुट पालनासाठी कोंबडया तसेच बकरी पालनासाठी बकऱ्या, व शिलाई मशीनचे वाटप हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाचे संचालन १९२ बटालियनच्या कमांडंट श्रीमती संध्याराणी यानी केले. दीपकूमार साहू यांनी आभार मानले. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
AE6BR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना