शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

देशभरात सरकारविरोधी वातावरण, शेतकरी, मजूर, व्यापारी समाधानी नाहीत-शरद पवार

Wednesday, 15th November 2017 05:25:45 AM

गडचिरोली, ता.१५: नोटाबंदी, जीएसटी व शेतमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी, मजूर, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये सरकारबद्दल तीव्र असंतोष खदखदत असून, २०१९ च्या निवडणुकीत भाजपला सत्ता घालवावी लागेल, असे चित्र असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित मेळाव्याला संबोधित करण्यासाठी शरद पवार आज गडचिरोलीत आले होते. मेळाव्यापूर्वी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, अनिल देशमुख, रमेश बंग, गुलाबराव गावंडे, संदीप बाजोरिया, प्रकाश गजभिये, भाग्यश्री आत्राम, ऋतुराज हलगेकर,राजेंद्र वैद्य उपस्थित होते.

शरद पवार यांनी राज्य व देशातील एकूण स्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, आम्ही सत्तेत असताना राष्ट्रीय कृषी विकासाचा दर ८ टक्क्यांवर पोहचला होता. सध्या तो ३ ते सव्वा तीन टक्केच आहे. परंतु वस्तुस्थिती झाकण्यासाठी केंद्र सरकार निकषांत बदल करुन कृषिविकास दर जास्त झाल्याचा कांगावा करीत आहे. भारतासारख्या देशाला हे सोयीचे नाही. शेतीत भांडवली गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढविणे, तसेच निव्वळ ग्राहकांच्या नव्हे, तर उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेण्याची भूमिका राज्यकर्त्यांची असली पाहिजे, असे पवार म्हणाले.

राज्यात नागपूर, सांगलीसारख्या शहरांमध्ये दिवसाढवळ्या हत्या होत आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रिपद स्वीकारुनही जबाबदारी पार पाडली नाही, असा आरोप श्री.पवार यांनी केला. सध्या शिवसेना व भाजपमध्ये असलेली कुरबूर लक्षात घेता 'राज्य सरकारचं भतिव्य काय?' असा प्रश्न विचारला असता पवार यांनी 'मी ज्योतिषी नाही', असे उत्तर दिले. सरकार पडले तर आम्ही कुणालाही पाठिंबा देणार नाही, तसेच मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्जमाफीचा फायदा कुणालाही झाला नाही. सरकारची कर्जमाफी म्हणजे 'लबाडाच्या घरचं आमंत्रण, जेवल्याशिवाय काही खरं नाही', अशा शब्दात पवारांनी खिल्ली उडवली. देशभरात सरकारच्या मदतीने गोरक्षकांचा सुळसुळाट सुरु आहे. दलित, मुस्लिमांचा हत्या केल्या जात आहेत आणि पंतप्रधान वक्तव्य करायला तयार नाहीत, अशी टीका शरद पवार यांनी केली. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आम्ही संसदेत प्रश्न विचारायचो. आरोप, प्रत्यारोप व्हायचे. परंतु कुठेही आकस आणि कटुता नव्हती. हल्लीच्या सरकारमध्ये तसा दृष्टिकोन दिसत नाही, असेही ते म्हणाले.

बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा रेल्वेलाच स्वच्छ व सुविधायुक्त बनवा, असा सल्ला पवारांनी दिला. आमच्या काळात १५ वर्षांत राज्य सरकारवर २ लाख १२ हजार कोटींचं कर्ज होतं. परंतु भाजप सरकारने केवळ ३ वर्षात कर्जाचा डोंगर ४ लाख २५ हजार कोटींवर नेऊन ठेवला, अशी टीका त्यांनी केली. केवळ जाहिरातबाजी सुरु आहे. लोकांना त्याचा फायदा नाही, मात्र वर्तमानपत्रांच्या मालकांचं भलं होत आहे, अशी कोपरखळीही पवारांनी मारली.

नक्षलवाद हा केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही

शरद पवार यांनी नक्षलवादासंदर्भातही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, नक्षलवाद हा केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. तो आर्थिक, विकास व मागासलेपणाशी निगडित मुद्दा आहे. यामुळेच काही लोक गैरफायदा घेत आहेत. दिवंगत आर.आर.पाटील यांनी पालकमंत्री म्हणून गडचिरोली जिल्ह्याला भरीव आथ्रिक मदत करुन विकास केला. त्यामुळे नक्षलवाद बऱ्याच अंशी आटोक्यात आला. नक्षलवाद संपविण्यासाठी केवळ पोलिस दल पुरेसं नाही, तर लोकांचं जीवनमान सुधारलं तरच नक्षलवाद संपेल, असेही श्री.पवार म्हणाले. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
413S4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना