शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

महावितरणने खंडित केला ५ दिवसांत ३४८४ ग्राहकांचा वीजपुरवठा

Sunday, 26th November 2017 07:09:38 AM

गडचिरोली,ता.२६: महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात २१ ते २६ नोव्हेंबर दरम्यान धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान तब्बल ३४८४ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

यापूर्वी ८ ते १० नोव्हेंबर दरम्यानही मोहीम राबविण्यात आली होती. परंतु थकबाकीची रक्कम फार मेाठी असल्याने पुन्हा २१ ते २६ नोव्हेंबरदरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. या पाच दिवसात ३ हजार ४८४ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित करण्यात आला, तर ९३ हजार २९२ थकबाकीदारांपैकी २८ हजार ४१४ ग्राहकांनी कारवाईचा धसका घेत ४ कोटी ९८ लाखांचा भरणा केला. थकबाकीचा आकडा शून्यावर येईपर्यंत मोहीम राबविणे सुरुच असणार आहे. सोमवारपासून(ता.२७)पुन्हा मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.   

एकीकडे वीजबिल हाती आल्याबरोबर वीजबिलाचा भरणा करणारे ग्राहक, तर दुसरीकडे थकबाकीदार जे वीजबिल भरण्याचे टाळतात, अशा कचाट्यात महावितरण सापडली आहे. विकल्या गेलेल्या विजेच्या बिलाच्या माध्यमातून वसुली करून पुन्हा वीज विकत घ्यायची आणि ती ग्राहकांना पुरवायची जबाबदारी महावितरणची आहे. परंतु ही जबाबदारी पार पाडतांना थकबाकीदारांमुळे महावितरणला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

त्यामुळे महावितरणने आता शून्य थकबाकीचे सूत्र वापरण्यास सुरूवात केली असून, थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले आहे. एकदा वीजपुरवठा खंडित झाल्यावर तो पूर्ववत करण्यासाठी नियमाप्रमाणे पूनर्जोडणी शुल्क भरून घेतल्याशिवाय तो पूर्ववत न करण्याचा पवित्रा घेतल्यामुळे थकबाकीदारांची पंचाईत होत आहे. वीजपुरवठा थकबाकीसाठी खंडित झाल्यावर पूनर्जोडणी शुल्क भरून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करून घेईपर्यंत बराच काळ विजेशिवाय आता थकबाकीदारांना घालवावा लागत आहे. 

चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील पाणीपुरवठा येाजनांकडे १ कोटी ४१ लाख, तर सरकारी कार्यालयाकडे १ कोटी ७३ लाख थकबाकी आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांकडे ४० कोटी ३८ लाख, तसेच कृषिपंपधारकांकडे ६१ कोटी ९७ लाखांची थकबाकी जमा झाली आहे. शिवाय घरगुती ग्राहकांकडे १० कोटी, वाणिज्यिक ग्राहकांकडे ४ कोटी, तर औद्योगिक ग्राहकांकडे १ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

महावितरणचा कारभार सुरळीत चालण्याकरिता ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक विजेच्या युनिटची वसुली होणे गरजेचे आहे. 

यामुळे सर्व थकबाकीदार ग्राहकांनी थकीत असलेले वीजबिल त्वरीत भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केले आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HFEM5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना