शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

नक्षल्यांचा पोलिस पथकावर पुन्हा हल्ला-सीआरपीएफचा एक जवान शहीद, दोघे जखमी

Monday, 27th November 2017 06:13:05 AM

गडचिरोली, ता.२७: कोरची तालुक्यातील कोटगूल येथे नक्षल्यांच्या हल्ल्यात एक हवालदार शहीद झाल्याच्या घटनेची शाई वाळण्यापूर्वीच नक्षल्यांनी पुन्हा पोलिस पथकावर हल्ला चढविला असून, यात केंद्रीय राखीव दलाचा एक जवान शहीद, तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल संध्याकाळी गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत टवे-पड्यालमेटा येथील जंगलात घडली. मंजुनाथ शिवलिंगप्पा(३१) असे शहीद जवानाचे नाव असून, तो कनार्टक राज्यातील मानागुंडी, धारवाड येथील रहिवासी आहे. या घटनेत लोकेशकुमार व दीपक शर्मा(दोघेही उत्तरप्रदेश) हे जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आले आहे.

२४ नोव्हेंबरला नक्षल्यांनी कोटगूल येथे केलेल्या भूसुरुंगस्फोटात हवालदार सुरेश गावडे हे शहीद झाले, तर सोनल खेवले व विकास धात्रक हे जवान जखमी झाले. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी नक्षलविरोधी अभियानाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डी.कनकरत्नम व पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्या भागात नक्षली कारवाया वाढल्यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक नक्षलशोध अभियानावर पाठविण्यात आली. काल संध्याकाळी गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रातील केंद्रीय राखीव दलाच्या ११३ बटालियनचे जवान व जिल्हा पोलिस अशी सुमारे ६० जणांची एक तुकडी टवे-पड्यालमेटा येथील जंगलात गेली होती. ही तुकडी त्या भागात मुक्कामी जाणार होती. एवढयात सशस्त्र नक्षल्यांनी या तुकडीवर हल्ला चढविला. सुरवातीला नक्षलवादी पोलिसांचा दबाव पाहून पळून गेले. मात्र, परिस्थिती वेगळीच होती. नक्षलवादीच जवळच्या पहाडावर चढून पोलिसांवर नजर रोखून होते आणि इकडे पोलिस चकमकीच्या घटनास्थळाची पाहणी करीत होते. यावेळी रात्र झाली होती. ही संधी साधून नक्षल्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. या तुंबळ चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद, तर दोन जण गंभीर जखमी झाले, अशी प्राथमिक माहिती आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवादी पहाडावर आणि पोलिस पायथ्याशी, अशी स्थिती होती. त्यामुळे नक्षलवाद्यांना पोलिसांना टार्गेट करणे सोपे होते. चकमकीत सहभागी जवान वॉकिटॉकीवरुन आपल्या वरिष्ठांना माहिती देत होते. मात्र, पोलिसांच्या बोलण्याचा आवाज येताच नक्षलवादी गोळीबार करीत होते. त्यामुळे पोलिसांना वॉकिटॉकीवरुन संदेश देणे बंद करावे लागले. परिणामी घटनास्थळी नेमके काय चालले आहे, हे प्राथमिक माहितीशिवाय वरिष्ठांना काहीही कळू शकले नाही. परिणामी घटनास्थळी अडकलेल्या जवानांना मदत पोहचविण्यास बराच उशिर झाला. रात्री उशिरा अतिरिक्त कुमक जवानांच्या मदतीला पाठविण्यात आली आणि पुढे पहाटेपर्यंत ही चकमक सुरुच होती. या चकमकीत काही नक्षलवादी ठार झाले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

चालू आठवड्यात नक्षल्यांनी धानोरा तालुक्यात ३ नागरिकांची हत्या केली, तर २ जवानांना शहीद व्हावे लागले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ माजली असून, गृहविभागही हादरला आहे.  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
E4HFL
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना