गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

अंगावर वाहन चालवून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ८ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Tuesday, 28th November 2017 06:45:49 AM

गडचिरोली, ता.२८: लग्नाच्या वरातीत नाचण्यावरुन शाब्दीक चकमक उडाल्यानंतर संबंधित युवकाच्या अंगावर वाहन चालवून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस येथील विशेष सत्र न्यायालयाने ८ वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विलास भैसारे असे दोषी इसमाचे नाव आहे.

ही घटना १५ मे २०१३ ची आहे. घटनेच्या दिवशी आरमोरी तालुक्यातील सुकाळा येथे एक लग्न होते. या लग्नाच्या वरातीत स्वप्नील हडप, रितेश राऊत व विलास भैसारे,राकेश तोरणकर, मंगेश आलाम आणि लोकेश लठ्ठे यांच्या नाचण्यावरुन भांडण झाले. मात्र, या भांडणाचा बदला घेण्याचे विलास भैसारे याने ठरविले. त्यानंतर स्वप्नील हडप हा एमएच ३३-ए ८८२५ क्रमांकाच्या मोटारसायकलने सुकाळ्यावरुन वैरागडकडे येत असताना विलास भैसारे याने महिंद्रा मॅक्स या चारचाकी वाहनाने स्वप्नीलच्या मोटारसायकलला जाणीवपूर्वक धडक दिली. यात स्वप्नील हडप याची छाती, तोंड, हात व पायाला जबर दुखापत झाली.

तसेच मोटारसायकलच्या मागे बसलेला रितेश राऊत यालाही मार लागला. याप्रकरणी गिरीश रामराव राऊत यांनी आरमोरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर सहायक फौजदार प्रभाकर रोहनकर यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या खटल्याचा निकाल लागला. न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून, तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी विलास खुशाल भैसारे यास भादंवि कलम ३०७ अन्वये ७ वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार  रुपयांचा दंड आणि भादंवि कलम ४२७ अन्वये १ वर्षाचा कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतून स्वप्नील हडप यास ५ हजार रुपये व रितेश राऊत यास ३ हजार रुपये, तसेच फिर्याद देऊन जखमींना वैद्यकीय उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केल्याबद्दल गिरीश राऊत यास २ हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश पारित केला. या प्रकरणात इतर आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UQD47
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना