शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यासह अभियांत्रिकी सहायक एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 29th November 2017 06:34:06 AM

गडचिरोली, ता.२९:नालीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कामाच्या अंतिम देयकावर प्रतीस्वाक्षरी करुन ते मंजुरीसाठी जिल्हा परिषद कार्यालयाकडे पाठविण्याकरिता संबंधित कंत्राटदाराकडून लाच स्वीकारताना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यासह अभियांत्रिकी सहायकास रंगेहाथ पकडून अटक केली. गोविंद कृष्णराव शिरपूरकर(३९) व राहुल श्रीराम नागदेवते(३७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोविंद शिरपूरकर हा धानोरा येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागात शाखा अभियंता आहे, तर राहुल नागदेवते हा जिल्हा परिषदेत अभियांत्रिकी सहायक पदावर आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा कंत्राटदार असून, त्याने धानोरा तालुक्यातील धुसानटोला येथे मार्च २०१७ मध्ये नालीचे बांधकाम पूर्ण करुन कामाचे अंतिम देयक जिल्हा परिषदेच्या धानोरा येथील बांधकाम उपविभागाकडे सादर केले. परंतु नाली बांधकामाच्या ८९ हजार २७९ रुपयांच्या अंतिम देयकावर प्रतीस्वाक्षरी करुन ते गडचिरोली येथील जिल्हा परिषद कार्यालयाकडे पाठविण्याकरिता शाखा अभियंता गोविंद शिरपूरकर याने तक्रारकर्त्या कंत्राटदारास ५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो ३ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज गडचिरोली जिल्हा परिषदेत सापळा रचला. यावेळी शाखा अभियंता गोविंद शिरपूरकर याने तक्रारकर्त्या कंत्राटदाराकडून स्थापत्य अभियांत्रिकी सहायक राहुल नागदेवते याच्या मार्फतीने ३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाले. यावरुन एसीबीने गोविंद शिरपूरकर व राहुल नागदेवते यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७,१२,१३(१)(ड) व १३(२) अन्वये गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

एसीबीचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक डी.एम.घुगे, पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, शिपाई रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, मिलिंद गेडाम, महेश कुकडकर, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, सोनल आत्राम, तुळशीदास नवघरे व घनश्याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
IS3LL
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना