शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

योजना पोहचविण्यासाठी 'प्रभागसंघ' प्रभावी माध्यम: सीईओ शांतनू गोयल

Saturday, 2nd December 2017 03:46:08 AM

गडचिरोली, ता.२ : स्वयंसहायता बचतगटांनी एकत्र येऊन तयार केलेले ग्रामसंघ व प्रभागसंघ हे शासकीय योजना पोहचविण्याचे प्रभावी माध्यम होऊ शकते. शासकीय विभागांनी आता या व्यासपीठाचा उपयोग विविध योजनांचा कृतीसंगम करण्यासाठी करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत अहेरी तालुक्यातील देवलमरी येथे आयोजित संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या अभ्यासदौऱ्याप्रसंगी श्री. गोयल बोलत होते.

देवलमरी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' अंतर्गत रुद्रमादेवी प्रभागसंघाची २०१४ मध्ये स्थापना करण्यात आली. या प्रभागसंघासोबत एकुण १६ ग्रामसंघ जुळले असून, प्रभागसंघामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या प्रभागसंघाचे कार्य जाणून घेता यावे, यासाठी २५ नोव्हेंबर रोजी अभ्यासदौऱ्‍याचे आयोजन करण्यात आले होते. 

या अभ्यासदौऱ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, प्रकल्प संचालक सुनीलकुमार पठारे यांच्यासह सर्व १२ तालुक्यांतील संवर्ग विकास अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी मान्यवरांनी रुद्रमादेवी प्रभागसंघाच्या मासिक बैठकीचे सुमारे तीन तास अवलोकन केले. तदनंतर प्रश्नोत्तराच्या स्वरुपात अधिकाऱ्यांनी प्रभागसंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी प्रभागसंघाच्या अध्यक्षा शांताबाई जंगम आणि श्री. गोयल यांच्या हस्ते अभियानाच्या माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.प्रभागसंघासोबत २५० स्वयंसहायता बचतगट जुळले असून, प्रभागसंघामार्फत त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या जातात, तसेच त्यांना उत्पन्नवाढीसाठी मार्गदर्शन केले जाते.

मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी यावेळी प्रभागसंघाने मागील दोन वर्षात केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. उमेद अभियानातंर्गत स्वयंसहायता बचतगटांची मोठ्या प्रमाणात क्षमताबांधणी केली जात आहे. अनेक गट, ग्रामसंघ आर्थिकदृष्टया सक्षम झाले आहेत. आता गटातर्गंत जुळलेल्या गरजूंना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणांनी ग्रामसंघ, प्रभागसंघाच्या व्यासपीठाचा योग्य वापर केला पाहिजे, असे ते म्हणाले. ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका, आशावर्कर अशा स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या व्यक्तींनी ग्रामसंघ, प्रभागसंघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना तळागाळापर्यंत पोचविल्या पाहिजे, असेही ते म्हणाले. 

याप्रसंगी प्रभागसंघामार्फत चालविल्या जात असलेल्या किराणा दुकानाच्या कार्यपद्धतीचीही अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. अभ्यासदौऱ्याच्या नियोजनासाठी जिल्हा तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाने सहकार्य केले.

मत्स्य उपक्रमास भेट

अभियानातंर्गत मत्स्यपालनाचा उपक्रम चालविला जातो. यातंर्गत स्वयंसहायता गटाकडून मत्स्यपालन करण्यात येत असलेल्या व्यंकटरावपेठा येथील तलावास संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी मत्स्यसखीने मत्स्यपालनासंदर्भात माहिती दिली. परंपरागत पद्धतीने करण्यात येत असलेल्या मत्स्यपालनात सुधारणा केल्यास उत्पादनात मोठी वाढ होत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ALRH3
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना