गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाचा खून करणाऱ्या ६ जणांना जन्मठेपेची शिक्षा

Friday, 8th December 2017 08:05:49 PM

गडचिरोली, ता.९ जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरुन वृद्धाचा खून करणाऱ्या ६ जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

ही घटना भामरागड तालुक्यातील वटेली येथील आहे. तेथील रहिवासी मुन्शी झुरी आत्राम हा आजारी नागरिकांवर झाडपत्तीचा उपचार करीत होता. लोकही त्याच्याकडे उपचारासाठी जात होते. परंतु मुन्शी आत्राम हा जादूटोणा करतो, असा काही लोकांचा संशय होता. त्यामुळे या मंडळींनी त्याचा काटा काढण्याची योजना आखली. १५ ऑगस्ट २०१६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मुन्शी, त्याची पत्नी व मुलगा प्रकाश हे घरीच होते. यावेळी गावातील मुरा चिक्कू मडावी, राजू इरपा नरोटे, कोरके झुरु मडावी, थापा कारे तेलामी व महागू पुसु आत्राम हे मुन्शीच्या घरी आले. त्यांनी गावात बैठक असल्याचे सांगून मुन्शीला बाहेर नेले. बैठकीत त्यांनी मुन्शीला जादूटोणा करीत असल्याचे सांगून दमदाटी केली आणि काठी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यावेळी पत्नी झुरी हिने मध्यस्थी करुन मारहाण न करण्याची विनंती केली. मात्र, तिचे काहीही ऐकून न घेता सहाही जणांनी त्याला ओढत ओढत नाल्याकडे नेले. तेथे मुन्शीचा जावई साधू वंजा मडावी हादेखील पोहचला. परंतु त्यालाही मध्यस्थी न करण्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी दिली. संध्याकाळपर्यंत मुन्शी घरी न परतल्याने मुन्शीची पत्नी झुरी हिने चौकशी केली असता, आम्ही मुन्शीला ठार मारुन नाल्यात फेकल्याची माहिती सहाही जणांनी दिली. पोलिसांना माहिती दिल्यास तुलाही ठार मारु, अशी धमकी तिलाही देण्यात आली. दुसऱ्या दिवशी(ता.१६) सकाळी मुन्शीचा मृतदेह नाल्यातील झाडाला लटविकेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी फिर्यादीनंतर पोलिसांनी उपरोक्त सहाही आरोपींवर गुन्हे दाखल केले. पोलिस उपनिरीक्षक मिलिंद बोरसे यांना आरोपींना अटक केल्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्षदारांचे बयाण नोंदवून कलम ३०२ व सहकलम १४९ अन्वये आरोपी मुरा चिक्कू मडावी, राजू इरपा नरोटे, कोरके झुरु मडावी, थापा कारे तेलामी व महागू पुसु आत्राम यांना जन्मठेप व २०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मृतकाच्या वारसांना भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.

सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नीळकंठ भांडेकर, तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक प्रफल्ल कदम यांनी काम पाहिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
E6VEI
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना