गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

देसाईगंजमध्ये घरकुल घोटाळा?, पोलिसांत तक्रार

Tuesday, 12th December 2017 06:12:29 AM

गडचिरोली, ता.१२: देसाईगंज नगर परिषद क्षेत्रात २०१२-१३ मध्ये राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करीत माजी नगराध्यक्ष हिरा मोटवानी यांनी आज तेथील पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. यामुळे देसाईगंज शहरात खळबळ माजली आहे.

देसाईगंज नगर परिषदेतर्फे २०१२-१३ मध्ये घरकुल योजना राबविण्यात आली. या योजनेंतर्गत घरकुलासाठी पात्र लाभार्थी हा अनुसूचित जाती, जमातीमधील दारिद्र्यरेषेखालील नागरिक असणे आवश्यक आहे. शिवाय लाभार्थीकडे त्याच्या स्वमालकीची जमीन आणि त्याचा सातबारा असणेही अनिवार्य आहे. परंतु नगर परिषदेने घरकुलासाठीचा निधी जमिनीचे मालक नसलेल्या लोकांसाठी वापरला. पात्र लाभार्थींना घरकुलाचा निधी देताना प्रत्येक कामाची पूर्तता झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येतो आणि ते काम लाभार्थीला स्वत:ला करावयाचे असते. परंतु नगर परिषदेने या नियमालाही हरताळ फासला. यापेक्षा भयावह बाब म्हणजे, मंजूर झालेले घरकुल सरकारी जागेवर बांधण्यात आले असून, नगर परिषदेने ते कंत्राटदाराकडून बनवून घेतले आहेत. शिवाय अनुसूचित जाती, जमातीपेक्षा खुल्या प्रवर्गातील नागरिकांनाच मोठ्या प्रमाणावर घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे. देसाईगंजमध्ये मंजूर ५०४ घरकुलांपैकी केवळ ११३ घरकुल अनुसूचित जाती, जमातीच्या नागरिकांना देण्यात आले, तर उर्वरित खुल्या व अन्य प्रवर्गातील लाभार्थींना वाटप करण्यात आले. त्यात काही जण सधन असून, काही मंडळी तत्कालिन सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील होती, असा आरोप हिरा मोटवानी यांनी केला आहे.

जळगाव नगर पालिकेने केलेला घरकुल घोटाळा बराच गाजला होता. २००८ मध्ये सुरेशदादा जैन नगराध्यक्ष असताना हा घोटाळा झाला आणि पुढे मंत्री झाल्यानंतर जैन यांना अटक झाली होती. देसाईगंजचा घरकुल घोटाळाही अगदी तसाच असल्याची चर्चा सुरु झाली असून, हिरा मोटवानी यांनी पोलिसांत तक्रार केल्याने आता पोलिस कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हा विषय नागपुरातील हिवाळी अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता आहे.

प्रकरणाची चौकशी करु:पोलिस निरीक्षक श्री.मांडवकर

घरकुल घोटाळ्यासंदर्भात माजी नगराध्यक्ष हिरा मोटवानी यांनी देसाईगंज पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने आपण चौकशी करु, लेखा अहवाल तपासू व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेऊ, असे पोलिस निरीक्षक श्री.मांडवकर यांनी सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
3HDM0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना