गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

व्यसनमुक्त समाजासाठी सर्वांनी संकल्प करा-स्मिता पाटील

Saturday, 16th December 2017 07:15:18 AM

गडचिरोली, ता.१६: आजचा युवक हा उद्याचा सुजाण नागरिक होणार असल्याने भावी पिढी व्यसनापासून दूर असली पाहिजे. त्यामुळे व्यसनमुक्त समाजाचा सर्वांनी संकल्प करावा, असे आवाहन राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी केले.

'सर्च' संस्थेतर्फे 'मुक्तिपथ' कार्यक्रमांतर्गत आयोजित '...तर आमचे आबा वाचले असते' या विषयावर देसाईगंज व गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून स्व.आर.आर.पाटील यांच्या अर्धांगिणी आ.सुमन पाटील, डॉ.अभय बंग व पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख उपस्थित होते. सुरुवातीला दिवंगत आर.आर.पाटील यांच्या जीवनावरील लघुपट दाखवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. स्मिता पाटील पुढे म्हणाल्या, आबांनी ८० टक्के समाजकारण व केवळ २० टक्के राजकारण केले. आबा अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला आले. त्यांच्याकडे कुठलाही राजकीय वारसा व आर्थिक सुबत्ता नव्हती. कोणत्याही शैक्षणिक संस्था नव्हत्या. तरीही केवळ प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी आमदारकी, राज्याचे गृहमंत्रिपद व उपमुख्यमंत्रिपद भूषविले. विकासाची तळमळ असल्यानेच त्यांनी स्वत:हून गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मागून या जिल्ह्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त अभियान, डान्सबार बंदी असे राज्याच्या हिताचे महत्वाचे निर्णय घेतले. गडचिरोली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय, महिला रुग्णालय, सिरोंचा येथील पूल अशी उल्लेखनीय विकासकामे आबांनी केली. ते गडचिरोलीला जायला निघायचे, तेव्हा आम्ही घाबरत घाबरत त्यांना निरोप द्यायचो. त्यांनी फार कमी वेळ कुटुंबासाठी दिला. मात्र, जेव्हा ते कुटुंबासोबत बसायचे, तेव्हा केवळ गडचिरोली जिल्ह्याचा विकास आणि येथील लोकांविषयीच बोलायचे, असे स्मितांनी सांगितले.

स्मिता पाटील पुढे म्हणाल्या, आबांनी समाजसेवेचे व्रत स्वीकारले होते. ते अतिशय हळव्या मनाचे असल्याने समाजात घडणाऱ्या घटनांमुळे ते तणावात असत आणि त्यामुळेच त्यांना तंबाखूचे व्यसन लागले. मात्र, हळूहळू हे व्यसन वाढले आणि आबांना कॅन्सर झाला. परंतु निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याने त्यांनी उपचाराकडे दुर्लक्ष केले. उपचारापेक्षा त्यांनी राजकारणाकडे अधिक लक्ष दिले. शेवटी कॅन्सरने त्यांचा बळी घेतला. त्यांच्या निधनामुळे आमचे कुटुंब पोरके झाले( स्मिताच्या तोंडून हे ऐकताना सभागृहातील वातावरण धीरगंभीर झाले होते.) आज आमचे आबा गेले. पण, तुम्ही तुमचे बाबा गमावू नका, असे कळकळीचे आवाहनही स्मिता पाटील यांनी केले.

डॉ.अभय बंग यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून आबांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. डॉ.बंग म्हणाले, कोणत्याही व्यसनाची सुरुवात अगदी सहजपणे होते. विरंगुळा म्हणून लोक मादक पदार्थाचे सेवन करतात आणि हळूहळू त्याचे व्यसनात रुपांतर होते. गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू व खर्रा खाण्याचे प्रमाण प्रचंड आहे. ५० टक्के महिलादेखील या व्यसनाच्या आहारी गेल्या आहेत. हे व्यसन तत्काळ थांबविले नाही मोठी समस्या उभी राहील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आदिती अत्रे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
3Y285
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना