शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

कुणबी महामेळाव्यात माजी खासदार नाना पटोलेंची पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

Sunday, 17th December 2017 06:40:19 AM

गडचिरोली, ता.१७: मी ओबीसी व शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधानांच्या बैठकीत मांडले, त्यावेळी पंतप्रधान अंगावर आले. त्यांनी मला चूप बसवले. मी कुणाच्या भरवश्यावर निवडून आलो नाही, तर बहुजनांच्या भरवश्यावर विजयी झालो. स्वाभिमान दुखावल्याने मी खासदारकीचा राजीनामा दिला. पत्रकार मला भाजपचे बंडखोर खासदार म्हणतात. मी भाजपविरुद्ध नव्हे, तर मूठभर लोक करीत असलेल्या अन्यायकारी व्यवस्थेविरुद्ध बंड केले. ज्यांनी ओबीसी, शेतकरी व विद्यार्थ्यांचा गळा घोटून ३ पिढ्या बरबाद केल्या, त्यांच्याविरुद्ध मी सतत लढत राहीन, असे सांगून माजी खासदार नाना पटोले यांनी आज पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कुणबी महामेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आ.बाळू धानोरकर, आ.सुनील केदार, प्रख्यात कवी प्रा.ज्ञानेश वाकुडकर, प्रा.दिलीप चौधरी, मेघा रामगुंडे, वैष्णवी डफ, प्रफुल्ल गुडधे, नरेंद्र जिचकार आदी मान्यवर उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कुणबी समाजाचा अभूतपूर्व मेळावा झाला. सुमारे २० हजार लोकांच्या भरगच्च मेळाव्यात नाना पटोले यांनी केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडले. श्री.पटोले म्हणाले, शेतकरी संकटात आहे. त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. आणेवारीची इंग्रजकालीन पद्धत अजूनही सुरु आहे. ती बंद करण्याची मी मागणी केली. पंतप्रधानांच्या बैठकीत मी शेतकरी व ओबीसींचे प्रश्न मांडले, तेव्हा पंतप्रधान माझ्या अंगावर आले. मी त्यांच्या नव्हे, तर बहुजन समाजाच्या भरवश्यावर निवडून आलो. आम्ही स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी केली. परंतु याच सरकारने सर्वोच्च न्यायालयात शिफारसी लागू करता येणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले. पंतप्रधान ओबीसींच्या हिताचे निर्णय घेत नाही, असे लक्षात येताच आम्ही त्यांची जात शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा २००१ मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना खुल्या प्रवर्गात होते. नंतर ते तेली कसे झाले, असा सवाल नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना गरिबांविषयी आस्था नाही. राज्य सरकारने मच्छिमारांची वाट लावली. विद्यार्थ्यांना ३ वर्षांपासून शिष्यवृत्ती दिली नाही. यामुळे ३ पिढ्या बरबाद झाल्या. ज्यांनी आमच्या आयाबहिणींना रस्त्यावर यायला भाग पाडलं, त्यांना विसरु नका. यापुढचा मुख्यमंत्री ओबीसी व्हावा, यादृष्टीने वाटचाल करा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी संत तुकाराम महाराजांना संपविले, आता हार्दिक पटेललाही संपविण्याचा प्रयत्न झाला. मलाही संपविण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असे भावनिक उद्गारही पटोलेंनी काढले. आम्ही कुणाच्या भिक्षेवर जगणारे नाही, असे सांगून पटोले म्हणाले की, कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकरी गुन्हेगार नसेल तर कशाची माफी देता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीपूर्वी नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी पेसा कायदा शिथिल करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात काहीच केले नाही, असा आरोप पटोलेंनी केला. सुरजागड लोहप्रकल्प याच जिल्ह्यात व्हावा, अशी आमची भूमिका होती. परंतु ३ हजार पोलिसांच्या संरक्षणात खाणीतील लोहखनिज दुसरीकडे नेले जात आहे. संबंधित कंपनीचे सरकारशी साटेलोटे आहेत, असाही आरोप पटोले यांनी केला.

याप्रसंगी आ. सुनील केदार म्हणाले की, हे सरकार 'फोडा आणि झोडा' या इंग्रजांच्या नीतीप्रमाणे काम करीत आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. परंतु सरकार लक्ष द्यायला तयार नाही. शेतमालाला भाव नाही. ओबीसींवरील अन्याय दूर केला जात नाही. त्यामुळे आता ओबीसींनी एकत्र येऊन लढा द्यावा, असे आवाहन श्री.केदार यांनी केला. यावेळी मेघा रामगुंडे व वैष्णवी डफ यांनीही सरकार ओबीसी व शेतकरीविरोधी असल्याची टीका करुन सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले.

मोदींनी देशाला देशोधडीला लावले-आ.बाळू धानोरकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला देशोधडीला लावले, असा आरोप शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी आजच्या कुणबी महामेळाव्यात केला. नोटाबंदी करुन मोदींनी महिलांच्या पैशावर डल्ला मारला. जनधन योजनेतून लोकांच्या बँक खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही. उलट सरकारने ३५ कोटी लोकांचा विश्वासघात केला. ज्यांनी केवळ खारका-बदामा खाऊन पूजापाठ केले,ज्यांनी कधी शेती केली नाही, तेच लोकांना गोमूत्र आणि गायीच्या गोष्टी सांगायला लागले आहेत, अशी टीका करुन आ.धानोरकर यांनी हे सरकार 'अपघाती सरकार' असल्याचे सांगितले. प्रा.नरेंद्र आरेकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. प्रास्ताविक महेंद्र ब्राम्हणवाडे, तर आभार प्रदर्शन धनपाल मिसार यांनी केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
J64G5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना