शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गोडसेंचं नाव घेऊन गांधीजींचा जयजयकार चालणार नाही:प्रा.ज्ञानेश वाकुडकर

Sunday, 17th December 2017 08:18:27 AM

गडचिरोली, ता.१७: आम्हीही हिंदूच आहोत, पण आमचं हिंदुत्व शिवाजी महाराज आणि संत तुकारामाचं आहे. मात्र, काही मंडळी हिंदुत्वाच्या नावावर बहुजनांची दिशाभूल करीत आहेत. हे लोक गोडसेंचं नाव घेतात आणि तिकडे गांधीजींचाही अधूनमधून जयजयकार करतात. हे आता चालणार नाही, असा इशारा प्रख्यात कवी प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी आज येथे दिला.

गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कुणबी महामेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. भाजपमधून बाहेर पडलेले माजी खा.नाना पटोले यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून आ.बाळू धानोरकर, आ.सुनील केदार, प्रख्यात कवी प्रा.ज्ञानेश वाकुडकर, प्रा.दिलीप चौधरी, मेघा रामगुंडे, वैष्णवी डफ, प्रफुल्ल गुडधे, नरेंद्र जिचकार आदी मान्यवर उपस्थित होते. 

आहे कशी म्हणावी देशात लोकशाही

खुर्चीमध्ये खुन्यांचे बसले छुपे शिपाई

या फांदीवरुन त्या फांदीवर मस्त मारता उड्या

विदेशातल्या शेळ्या हाकत किती सोडता पुड्या!

या कवितेने भाषणाची सुरुवात करुन प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी श्रोत्यांची मने जिंकली. प्रा.वाकुडकरांनी काव्यरुपात, तर कधी धारदार शैलीत सरकार व व्यवस्थेवर जोरदार आसूड ओढले. ते म्हणाले, हे सरकार लोकशाहीच्या मुळावरच घाला घालत आहे. यांना माणसांची कमी आणि गायीची चिंता जास्त आहे. येथे ओबीसी समाज ५२ टक्के आहे आणि त्याला केवळ एक मंत्रालय कसे देता, असा सवाल करुन प्रा.वाकुडकर यांनी आता आम्हाला मुख्यमंत्रिपद पाहिजे, असे ठणकावून सांगितले. केवळ आंदोलने करुन ओबीसींचे प्रश्न सुटणार नाहीत, तर निवडणूक हेच त्याचे मोठे अस्त्र आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत कुणबी व समस्त ओबीसींनी त्यांच्या विरोधात काम करणाऱ्या सरकारला जागा दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले. पुढील सरकार बळीराजाचं असलं पाहिजे, यासाठी आपण राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये 'बळीराजाच्या मुला' हे अभियान राबविलं. पुढचा टप्पा लवकरच सुरु होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी प्रा.वाकुडकर यांनी 'बळीराजा जागा हो रे, तू राजा हो रे बळी राजा' या कवितेद्वारे बळीराजाला ताकद दाखवून देण्याचे आवाहन केले. 

कुणबी समाजाने पैशाची उधळपट्टी बंद करुन वाईट चालीरिती व अंधश्रद्धा सोडाव्यात. भविष्यात एकजूट कायम ठेवावी, असे आवाहनही प्रा.वाकुडकर यांनी केले.

याप्रसंगी प्रा.दिलीप चौधरी यांनीही सरकारवर प्रहार केले. ते म्हणाले, एकीकडे नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शिष्यवृत्ती मिळत नाही म्हणून विद्यार्थीही आत्महत्या करीत आहेत आणि दुसरीकडे सरकार मेट्रो, स्मार्ट सिटीसारखे उपक्रम राबवीत आहे. आम्हाला माणसं मारुन महासत्ता बनायचे नाही, अशा शब्दात प्रा.चौधरी यांनी सरकारला सुनावले. कुणबी ही जात नाही, तर तो जीवनव्यवहार आहे. ती संस्कृती आहे, असे सांगून प्रा.चौधरी म्हणाले की, इतिहास माहिती असण्याबरोबरच काहीतरी नवनिर्माण करण्याची वृत्ती असेल, तरच समाज जीवंत राहू शकतो. ओबीसींच्या आरक्षणासाठी नवव्या अनुसूचीत समावेश होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
A41U8
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना