शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

नक्षल्यांना दिला जातो ग्रामसभांचा पैसा-भूमकाल संघटनेचा आरोप

Friday, 22nd December 2017 02:09:10 AM

गडचिरोली, ता.२२: बांबू व तेंदू संकलनामधून ग्रामसभांना मिळालेली मोठी रक्कम नक्षल्यांना दिली जात असून, या रकमेवरच नक्षलवादी मजबूत होत असल्याचा गंभीर आरोप भूमकाल संघटनेचे अध्यक्ष प्रा.अरविंद सोवनी व सचिव प्रा.श्रीकांत भोवते यांनी केला आहे.

प्रा.अरविंद सोवनी व प्रा.श्रीकांत भोवते यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, साधारणत: २०१३ पासून आदिवासी क्षेत्रातील ग्रामसभा देशात चर्चेत आल्या. कारण शासनाशी दीर्घकालीन लढा लढून या ग्रामसभांनी बांबू आणि तेंदूपत्त्यासारख्या संसाधनांवर अधिकार मिळवले. त्यामुळे गडचिरोलीतील अगदी लहान लहान गावांच्या ग्रामसभांनासुद्धा प्रचंड मोठा निधी स्थानिक विकासासाठी उपलब्ध झाला. खरेतर अनेक मागासलेल्या आणि दुर्गम गावांसाठी गावाचा विकास करण्याची ही मोठी संधी होती. परंतु प्रत्यक्षात प्रचंड पैसा खर्च होऊनही जमिनीवर काहीही विकास दिसत नाही, असे प्रा.सोवनी व प्रा.भोवते यांनी म्हटले आहे.

काही नक्षलसमर्थक आणि गावातील समाजकंटकांनी संगनमताने गावाचा पैसा नक्षलवाद्यांना पोहचवून बराच निधी नक्षलच्या नावाखाली स्वतः गबन केल्याचा आरोपही सोवनी व भोवते यांनी केला आहे. 

एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा येथील ग्रामसभेला गेल्या दीड-दोन वर्षात बांबू व तेंदूमधून तीन कोटी रुपये मिळाले. मात्र, या गावात आजही ग्रामपंचायतीची इमारत नाही. कशाबशा दोन जुन्या विहिरी आहेत, गावात वीज नाही, धड रस्ता नाही. मात्र निधी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. मग हा निधी गेला कुठे? असा सवालही त्यांनी केला आहे. गर्देवाडा हे असे  एकच गाव नाही तर एटापल्ली, भामरागड व धानोरा तालुक्यातील अनेक ग्रामसभा या नक्षलसमर्थकांच्या दबावाला बळी पडल्या आहेत.

काही  नक्षलवाद्यांचे समर्थक आपल्या मर्जीतील दोन माणसांच्या ताब्यात ग्रामसभेचा अकाउंट देत आहेत व मनमानी पैसे काढून लाखो रुपये नक्षलवाद्यांना देत असून स्वतः सुद्धा लाखो रुपये उधळत आहेत. यामुळे नक्षल नेटवर्क मजबूत होत आहे. त्यासाठी अनेक कार्यक्रम घेत आहेत. आपल्या मर्जीतील लोकांना मोठ्या शहरांचे दौरे व चंगळ करायला पैसे देत आहेत, असा आरोप प्रा.सोवनी व प्रा.भोवते यांनी केला आहे.

ग्रामसभांच्या निधीवर शासनाचे कुठलेच नियंत्रण नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांचे चांगले फावले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी  ताबडतोब एक चौकशी समिती नेमून सुरुवातीला मोठा निधी मिळालेल्या काही निवडक ग्रामसभांच्या निधींबाबत चौकशी करावी, अशी मागणी भूमकाल संघटनेने केली आहे.

आमच्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास उर्वरित मोठा निधी मिळालेल्या सर्व ग्रामसभांची चौकशी करावी, ग्रामसभेच्या अधिकारात तेंदूपत्ता तसेच बांबूचे वेब पोर्टलच्या माध्यमातून एकत्रित ई-लिलाव करावे, रॉयल्टी आणि रोजी या दोन्हीचे पैसे थेट ग्रामसभा सदस्यांच्या खात्यांवर जमा करण्यात यावे, प्रत्येक आर्थिक वर्षात सर्व ग्रामसभांचे ऑडिट शासनाद्वारे अथवा कॅगद्वारे करण्यात यावे, ग्रामसभेच्या निधीच्या खर्चाबद्दल व स्थानिक निधी वापरून झालेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यात यावे इत्यादी मागण्या भूमकाल संघटनेने केल्या आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4LSA0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना