शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

जल-जंगल-जमिनीचा संघर्ष तीव्र करा-पेसा दिवस कार्यक्रमात आवाहन

Friday, 22nd December 2017 04:50:16 AM

गडचिरोली, ता.२२: जल, जंगल व जमिनीवर आदिवासींची मालकी आहे. मात्र, भांडवलवादी व्यवस्थेत या मालकी हक्कावरच गदा आणण्याचे प्रयत्न होत आहे. त्यामुळे समस्त आदिवासी, दलित व बहुजनांनी एकत्र येऊन जल, जंगल व जमिनीसाठीचा संघर्ष बुलंद करावा, असे आवाहन विविध वक्त्यांनी केले. धानोरा तालुक्यातील पेंढरी परिसरातील आलकन्हार येथे ग्रामसभा आणि झाडापापडा पारंपरिक इलाका गोटूल समितीच्या वतीने राष्ट्रीय पेसा दिनानिमित्त गुरुवारी (ता.२१) चर्चासत्र आणि क्रीडा महोत्सवाचे आयोजन होते, यावेळी उद्घाटनाच्या वेळी वक्त्यांनी संघर्षांचा सूर आळवला.  

झाडापापडा पारंपरिक इलाक्याचे मांझी  तानूजी गावडे, आलकन्हारचे भूमिया राजू गावडे, काशिराम नरोटे, अलसू नरोटे, सोमजी करंगामी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. सुरुवातीला गोंडी निसर्ग धर्माच्या झेंड्याचे पूजन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जि.प.सदस्य सैनू गोटा, अँड.लालसू नोगोटी, श्रीनिवास दुल्लमवार, भामरागड पं.स.सभापती सुकराम मडावी, पं.स.सदस्य शीला गोटा, रोशनी पवार, जयश्री वेळदा, रामदास जराते, छत्तीसगडच्या किरंगल परगण्याचे गोविंद वालको, लक्ष्मीकांत बोगामी, बावसू पावे उपस्थित होते.

 यावेळी मागील २० वर्षातील पेसा कायद्याच्या फलनिष्पत्तीवर वक्त्यांनी प्रकाश टाकला. गोविंद वालको यांनी पेसा कायद्याविषयी विस्तृत माहिती दिली. अॅड.लालसू नोगोटी व सैनू गोटा यांनी जल, जंगल व जमिनीवर मूळ निवासींचा अधिकार असून, त्यासाठी सर्वांनी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन केले. खाणीमुळे निसर्गाला धोका असून, पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्यामुळे आपला खाणींना विरोध असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनीही आदिवासी संस्कृती श्रेष्ठ असल्याचे सांगून पेसा कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली. रामदास जराते यांनी काही लोक आदिवासींवर हिंदुत्व लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून हा प्रयत्न हाणून पाडावा, असे आवाहन केले. पेसा कायद्यामुळे ग्रामसभांना मोठे अधिकार प्राप्त झाले असून, गावे समृद्ध होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी ग्रामसभांच्या माध्यमातून गावाचा विकास करावा, असे आवाहन जराते यांनी केले. जयश्री वेळदा यांनी पेसा कायदा आदिवासींच्या हिताचा असून, प्रशासनाने या कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बारसाय दुगा, वसंत पोटावी, देवू नरोटे, देवसाय आतला, मसरु तुलावी आदींनी सहकार्य केले.

 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
14SA0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना