बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

लोकबिरादरी प्रकल्पाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Saturday, 23rd December 2017 04:33:27 AM

हेमलकसा, ता.२३: थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी साकारलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाचा ४४ वा वर्धापनदिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शैक्षणिक जत्रेचेही आयोजन करण्यात आले होते. चार दिवस येथे कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

बाबा आमटे यांनी ४४ वर्षांपूर्वी भामरागडच्या निबीड अरण्यात हेमलकसा गावाजवळ आदिवासींच्या सर्वांगिण विकासासाठी २३ डिसेंबर १९७३ ला लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली, त्या घटनेला आज ४४ वर्षे पूर्ण झाली. पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या आदिवासींच्या अविरत सेवेलाही ४४ वर्षे पूर्ण झाली. विशेष म्हणजे, २३ डिसेंबर हा लोकबिरादरी प्रकल्पाचा वर्धापन दिन, २४ डिसेंबर हा डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या विवाहाचा वाढदिवस, २५ डिसेंबर हा डॉ.मंदाकिनी आमटे यांचा वाढदिवस आणि २६ डिसेंबर हा डॉ.प्रकाश आमटे यांचा वाढदिवस आणि दिवंगत बाबा आमटे यांच्या जयंतीचा दिवस आहे. त्यामुळे चार दिवस या प्रकल्पात कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. 

आज पहिल्या दिवशी शैक्षणिक जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. लोकबिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गोटुलमध्ये श्रद्धेय बाबा आमटे व स्व.साधनाताई आमटे यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करुन व दीप प्रज्ज्वलन करुन वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ.प्रकाश आमटे, डॉ.मंदाकिनी आमटे, शिरोळचे आमदार उल्हास संभाजी पाटील, नगरसेवक पराग पाटील, अॅड.लालसू नोगोटी, डॉ.दिगंत आमटे, डॉ.अनघा आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, समीक्षा आमटे, आरती नानकर, तहसीलदार कैलास अंडील, पंचायत समिती सभापती सुखराम मडावी, रेणुका मनोहर, प्रा.डॉ.विलास तळवेकर उपस्थित होते.

लोकबिरादरी आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समीक्षा आमटे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या 'शैक्षणिक गंमत जत्रा' उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी 'बालकांचे हक्क' या विषयावर साकारलेल्या विविध उपक्रमांचे अवलोकन करुन मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 'ओरोगामी'(कागदी कला) प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट दिली. त्यानंतर 'ह्युमन्स ऑफउ गोंडवाना'(हैदराबाद) यांचे आदिवासी जीवनावरील छायाचित्रांचे प्रदर्शन बघून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

शैक्षणिक गंमत जत्रा, ओरोगामी कला प्रदर्शन, आदिवासी जीवनावरील छायाचित्रांचे प्रदर्शन, गोटुल इत्यादींना सहकार राज्यमंत्री शेखर चरेगावकर, प्रकल्पात आलेले पाहुणे व परिसरातील जिल्हा परिषद शाळा व अन्य शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.

समीक्षा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.विलास तळवेकर, मुख्याध्यापक शरीफ शेख, प्रा.गिरीश कुळकर्णी, प्रा.खुशाल पवार, प्रा.चंद्रिकापुरे, श्रीराम झोडे, जमून शेख, सौ.तळवेकर, गुट्टेवार, कुडयामी, विजया किरमिरवार, तुषार कापगते, भक्ती चौधरी, अनुसया पोरतेटे, सौ.चंद्रिकापुरे, सौ.शेख, अशोक चापले, प्रवीण राऊत आदींनी सहकार्य केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9YH4X
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना