शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

तीन जहाल नक्षल्यांचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण

Saturday, 23rd December 2017 07:11:18 AM

गडचिरोली, ता.२३: गडचिरोली व छत्तीसगडमधील विविध दलममध्ये कार्यरत ३ जहाल नक्षल्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. सतीश उर्फ हिळमा कोसा होळी, पाकली उर्फ पगणी अडमू पोयामी व मनोज उर्फ दशरथ सखाराम गावडे अशी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश उर्फ हिळमा कोसा होळी हा भामरागड दलममध्ये कार्यरत होती. ऑगस्ट २०१४ मध्ये तो मोपस दलम(दक्षिण बस्तर)मध्ये भरती होऊन फेब्रुवारी २०१५ पर्यंत तेथे सदस्य म्हणून कार्यरत होता. मार्च २०१५ त्याची मोपस दलममधून भामरागड दलममध्ये बदली झाली. ऑक्टोबर २०१७ पर्यंत तो या दलममध्ये कार्यरत होता. कुरेनार(छत्तीसगड)कडे जाणाऱ्या रस्त्यावर अॅम्बुश लावून चकमक घडवून आणणे, गुंडूरवाही येथील चकमक व अन्य गंभीर गुन्ह्यांत त्याचा सहभाग होता. शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

पाकली उर्फ पगणी अडमू पोयामी ही छत्तीसगडमधील सांड्रा दलममध्ये कार्यरत होती. २०१७ ला परसेगड दलममध्ये भरती होऊन मे २०१७ पर्यंत ती तेथे कार्यरत होती. जून २०१७ ला तिची सांड्रा दलममध्ये बदली करण्यात आली. तेथे ती डिसेंबर २०१७ पर्यंत कार्यरत होती. सागमेटा चकमक, मुकवाडा चकमक व अन्य गुन्ह्यांमध्ये तिचा सहभाग होता. तिच्यावर २ लाखांचे बक्षीस होते. 

मनोज उर्फ दशरथ सखाराम गावडे हा केकेडी दलममध्ये कार्यरत होता. २०११ मध्ये केकेडी दलममध्ये भरती होऊन तो नोव्हेंबर २०१२ पर्यंत तेथे कार्यरत होता. नंतर तो आपल्या घरी आला. पुढे तो अधूनमधून नक्षल्यांसोबत फिरावयास जाणे, गावात दलमचे सदस्य आल्यावर त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणे, बैठकीकरिता गावकऱ्यांना गोळा करणे अशी कामे तो डिसेंबर २०१७ पर्यंत करीत होता. लेकुरबोडी व फुलगोंदी चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 

आज या तिघांनीही नक्षलविरोधी अभियानाचे अपर पोलिस महासंचालक डी.कनकरत्नम, विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार, पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. चालू वर्षांत आतापर्यंत एक कंपनी सदस्य, एक एरिया कमिटी सदस्य यांच्यासह विविध दलमच्या २२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पित नक्षल्यांपासून प्रेरणा घेऊन दलममधील इतर सदस्यही नक्कीच आत्मसमर्पण करतील, असा विश्वास पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
T6LMH
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना