मंगळवार, 16 जानेवारी 2018
लक्षवेधी :
   धानोऱ्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या, नागरिक भयभीत             सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्याची अफरातफर, देसाईगंज पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल             पतंगाच्या मांजामुळे दोघे जण जखमी-गडचिरोलीतील घटना           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%

सरकारने कर्जमाफीसाठी वापरला दलित, आदिवासींचा निधी-काँग्रेस प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे

Tuesday, 26th December 2017 09:00:05 AM

गडचिरोली, ता.२६: सरकार सातत्याने दलित व आदिवासींवर अन्याय करीत असून, समाजकल्याण व आदिवासी विकास विभागाचे साडेतीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरुन सरकारने या घटकांवर कुठाराघात केला, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे  प्रवक्ते व अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.राजू वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

डॉ.राजू वाघमारे यांनी सांगितले की, भाजप सरकार सत्तेत आल्यापासून दलित व आदिवासींवर अन्याय सुरु आहे. आतापर्यंत या घटकांच्या हिताच्या ३५६ योजना बंद करण्यात आल्या असून, बजेटमध्ये ४० टक्के कपात करण्यात आली आहे. गेल्या ३ महिन्यांत आदिवासी विकास विभागाचे ५०० कोटी व समाजकल्याण विभागाचे ३०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरले. ज्यांच्या ताटात काहीच नाही, त्यांच्याकडूनच हिरावून घेण्याचे हे षडयंत्र आहे. एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायचे, त्यांच्यावर पुस्तके काढायची आणि दुसरीकडे मागासवर्गीय विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती अडवून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे, असा हा डाव असल्याची टीका डॉ.राजू वाघमारे यांनी केली. सरकारने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा कमी केल्या आहेत, विद्यार्थ्यांना भोजनाचे पैसे दिले जात नाही. सरकारी शाळा बंद करुन गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणच घेऊ द्यायचे नाही, असा हा प्रकार आहे, असे डॉ.वाघमारे म्हणाले.

कर्जमाफीचे पैसे दिवाळीपूर्वी मिळणार, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. परंतु प्रत्यक्षात पैसे मिळाले नाहीत. यावरुन मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. सरकारने खरंच कर्जमाफी दिली असेल तर त्या शेतकऱ्यांची यादी जाहीर का केली जात नाही, असा सवाल डॉ.वाघमारे यांनी केला. सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा आहे. संगणकाशी संबंधित विभाग मुख्यमंत्र्यांकडे आहे. सरकारी पोर्टलच्या माध्यमातून वस्तुंची खरेदी करण्याचा निर्णय झाला असताना मुख्यमंत्र्यांनी आपला विभाग पोर्टलवरुन वगळला. या विभागात प्रचंड भ्रष्टाचार झाला. मात्र, सचिवाची बदली करण्यात आली. अधिकाऱ्याची बदली करुन मुख्यमंत्री त्यातून सुटू शकत नाही. या प्रकरणाची सीआयडी व निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही डॉ.राजू वाघमारे यांनी केली.

मागासवर्गीय मतदार काँग्रेसपासून दुरावत चालल्याने त्याला जवळ करण्यासाठी काँग्रेसने सामाजिक परिवर्तन अभियान सुरु केले आहे. मागासवर्गीय समाज रिपब्लिकन पक्षाचे विविध गट, बीएसपी व अन्य पक्षांमध्ये विखुरला आहे. हे सर्व पक्ष भाजपला पराभूत करु शकत नाही. त्यामुळे या समाजाला काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती डॉ.वाघमारे यांनी दिली.

पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हा महासचिव प्रभाकर वासेकर, युवक काँग्रेसचे लोकसभाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, श्री.रत्नपारखी, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
FRKBK
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना