गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२०: मुंबईत झालेल्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीशी राज्य शासनाने करार केल्याने आता कोनसरी येथे होणाऱ्या लोहप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून, सुमारे ८०० सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील पहाडावरील लोहखनिजाची लीज मिळाल्यानंतर लॉयड मेटल्स कंपनीने चामोर्शी तालुक्यातील आष्टीनजीकच्या कोनसरी येथे लोहप्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने लॉयडने जवळपास ३५ शेतकऱ्यांची सुमारे ५०.२९ हेक्टर शेतजमीन संपादित करुन जमिनीच्या एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम २६ एप्रिल २०१७ रोजी धनादेशाद्वारे एमआयडीसीला दिली होती. एमआयडीसीने ही रक्कम शेतकऱ्यांना दिली. त्यानंतर १२ मे २०१७ रोजी कोनसरी येथे प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळीही प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वितरीत करण्यात आले होते.
पुढे ७ फेब्रुवारी २०१८ रोजी एमआयडीसीने संबंधित शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात रक्कम देण्याविषयीचे पत्र लॉयड मेटल्स कंपनीला दिले. या पत्राची दखल घेत लॉयड मेटल्स कंपनीने ८ फेब्रुवारी २०१८ रोजी तत्काळ ६ कोटी १ लाख ६९ हजार ८१८ रुपये एमआयडीसीकडे आरटीजीएस केले.
नुकतीच मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषद झाली. या परिषदेत राज्य सरकार व लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला. याप्रसंगी लॉयड मेटल्सचे मालक राजेश गुप्ता व अतुल खाडिलकर उपस्थित होते. या करारावर राज्याच्या उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल व लॉयड मेटल्सचे महाव्यवस्थापक हरिहरण एन.अय्यर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या करारानुसार, लॉयड मेटल्स कंपनी कोनसरी येथे ७०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार असून, त्यातून सुमारे ८०० सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्षात रोजगार मिळणार आहे. प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम जून २०२० पर्यंत होणार असून, उर्वरित काम २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे.
यामुळे लवकरच कोनसरी येथील लोहप्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊन बेरोजगारांना रोजगारांची संधी मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. शिवाय सरकारशी झालेला करार बंधनकारक असल्याने विरोधकांच्या आंदोलनातील हवा फुस्स झाली आहे.