गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

तलावात बुडवून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा

Friday, 23rd February 2018 04:49:11 AM

गडचिरोली, ता.२२: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला तलावात बुडवून हत्या करणाऱ्या पतीस येथील सत्र न्यायालयाने जन्मठेप व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हंसराज राजपुत रा.गोकुळनगर गडचिरोली असे दोषी इसमाचे नाव आहे.

२००८ मध्ये हंसराज राजपुत याचे लग्न अश्विना हिच्याशी झाले होते. लग्नानंतर दोघेही गोकुळनगर येथे राहू लागले. परंतु काही दिवसांनंतर हंसराज हा पत्नी अश्विना हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करु लागला. अनेकदा दारुच्या नशेत तो पत्नीला मारहाण करीत असे.

१० मे २०१७ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अश्विना राजपुत ही गडचिरोली येथील आठवडी बाजारानजीकच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेली. तिच्या मागेमागेच हंसराजदेखील गेला. अश्विना कपडे धूत असताना हंसराजने तिचे केस पकडून तिला खोल पाण्यात बुडवले. यातच तिचा मृत्यू झाला. मृत अश्विनाची आई शांताबाई मेश्राम हिच्या तक्रारीवरुन आरोपी हंसराज राजपुत याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालिन पोलिस निरीक्षक विजय पुराणिक यांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. सरकारी पक्षातर्फे एकूण ९ साक्षदारांचे बयाण नोंदविण्यात आले. सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी हंसराज राजपुत यास जन्मठेप व १ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. 

सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VO840
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना