शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 13th March 2018 06:47:29 AM

गडचिरोली, ता.१३: वैद्यकीय रजा कालावधीतील वेतनाचे देयक मंजुरीकरिता पाठविण्यासाठी आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्याकडून

८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडून अटक केली. डॉ.गोपाल प्रेमानंद पांढरे(३५), वैद्यकीय अधिकारी वर्ग ३(गट 'ब') असे जाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ते हे जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी पदावर कार्यरत आहेत. ते जानेवारी, फेब्रुवारी व मे २०१७ मध्ये वैद्यकीय रजेवर गेले होते. रजा कालावधीत त्यांना वेतन मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी रजा कालावधीत घेतलेल्या औषधोपचाराची कागदपत्रे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सादर केली. परंतु तीन महिन्यांच्या वेतनाचे देयक मंजुरीकरिता पाठविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाल पांढरे याने तक्रारकर्त्यास १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो ८ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला.

मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात सापळा रचला. यावेळी डॉ.गोपाल पांढरे याने तक्रारकर्त्याकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारली. यावरुन एसीबीने डॉ.गोपाल पांढरे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७,१३(१)(ड) व १३(२) अन्वये जिमलगट्टा उपपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

एसीबीचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील व पोलिस उपअधीक्षक डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, हवालदार विठोबा साखरे, शिपाई रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, महेश कुकडकर, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, तुळशीदास नवघरे यांनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K9U0S
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना