गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

चिचडोह बॅरेजचे काम पूर्ण, चाचणीसाठी प्रकल्पाचे सर्व दरवाजे बंद

Saturday, 17th March 2018 03:36:22 AM

गडचिरोली,ता.१७: चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेजचे बांधकाम सुरु आहे. या बॅरेजचे काँक्रिट बांधकाम व दरवाज्यांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून, दरवाजांमधून पाणी गळती होऊ नये, याकरिता त्याची चाचणी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रकल्पाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

चिचडोह बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरच्या बाजूस ३ किलोमीटर अंतरावर आहे. या बॅरेजची एकूण लांबी ६९१ मीटर असून त्यास १५ मीटर लांबीचे व ९ मीटर उंचीचे ३८ पोलादी दरवाजे बसविण्यात आले आहेत.  

२५ मार्च २०१८ पासून सर्व दरवाजे बंद करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे नदी पात्रात उर्ध्व बाजूस व नदीत आलेल्या नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होऊन नदीतील पाण्याची पातळी वाढणार आहे. या पाणीसाठयामुळे जीवित व वित्तहानी  होऊ नये म्हणून सर्व लगतची गावे व ग्रामपंचायतींनी आपल्या अख्त्यारितील गावकऱ्यांना याबाबत गावात दवंडीव्दारे नदी काठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतात कामे करतना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन चंद्रपूरच्या लघुपाटबंधारे विभागाने केले आहे.

शिवाय या कार्यालयाकडून ज्या शेताचे भूसंपादन किंवा सरळ खरेदी करण्यात आली आहे, त्या सर्व भूधारकांनी शेतातील कामे करताना खबरदारी घ्यावी किंवा खरेदी करण्यात आलेल्या शेतामध्ये शेतीची कोणतीही कामे करु नयेत. सर्व मासेमारी करणारे व पशुपालकांनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून नदी ओलांडू नये. रेती घाटातून रेती काढणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे विभागाचे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच सद्यस्थितीत जो पाणीसाठा होणार आहे तो फक्त चाचणीकरिता असल्यामुळे प्रकल्पातून केव्हाही पाणी सोडले जाऊ शकते, त्यामुळे प्रकल्पाच्या खालील बाजूच्या नागरिकांनी देखील दक्षता घ्यावी, असे आवाहन लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

                                                         


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
7SAM4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना