शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

एनआरएचएम कर्मचाऱ्यांनी सुरु केले बेमुदत कामबंद आंदोलन

Wednesday, 11th April 2018 05:13:25 AM

गडचिरोली, ता.११: शासनाच्या आरोग्य विभागात रिक्त पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आजपासून एनआरएचएम कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे जिल्हाभरातील आरोग्यविषयक कामकाज ठप्प झाले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात सुमारे १८ हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी व अधिकारी मागील १० वर्षांपासून अल्प मानधनावर काम करीत आहेत. बऱ्याच कर्मचाऱ्यांनी सरकारी नोकरीसाठी आवश्यक वयोमर्यादाही ओलांडली असून, कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी शासकीय सेवेत घेण्यात यावे, या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शिवाय मंत्री, खासदार व आमदारांना घेरावही घातला. मात्र, शासनाने या कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता ६ महिन्यांचीच पुनर्नियुक्ती करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. शिवाय पुढील पुनर्नियुक्तीकरिता एचआर परफार्मन्स इंडिकेटर्स तयार केले असून, त्याच्या निकषानुसारच मूल्यांकन करुन पगारवाढ देण्याचे धोरण निश्चित केले आहे.

हे इंडिकेटर्स रद्द करुन पुनर्नियुक्ती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच ठेवावी, तसेच रिक्त पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे, या मागण्यांसाठी आजपासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे इत्यादी ठिकाणी कार्यरत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अन्य अधिकारी व कर्मचारी अशा एकूण ८५० कर्मचारी आजपासून कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5K14X
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना