गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

भाजप आणि काँग्रेस या दोघांचेही धोरण सारखेच:डॉ.सुरेश माने

Friday, 13th April 2018 07:23:15 AM

गडचिरोली, ता.१३: भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या मूळ धोरणात अजिबात फरक नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत आपण या दोन्ही पक्षांना वगळून तिसरी आघाडी स्थापन करणार असल्याची माहिती बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुरेश माने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला बीआरएसपीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष दशरथ मडावी, जिल्हाध्यक्ष विलास कोडाप, गडचिरोली-चिमूर लोकसभाध्यक्ष डॉ.कैलास नगराळे, लोकसभा सचिव सदाशिव निमगडे, मोहनलाल मोटघरे, राज बन्सोड, मिलिंद बांबोळे उपस्थित होते. डॉ.माने म्हणाले, सध्या दलितांसाठी खूप काही करीत असल्याचा डिंडोरा भाजप नेते पिटत आहेत. खासदारांनी दलितांच्या वस्त्यांमध्ये जाऊन राहावं, असे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत. मात्र, एकीकडे भिमा कोरेगाव व भारत बंद आंदोलनादरम्यान निरपराध दलितांवर गुन्हे दाखल करायचे आणि दुसरीकडे दलितांसाठी खूप काही करीत असल्याचा डिंडोरा पिटायचा, हे नाटक भाजप नेत्यांनी बंद करावे, असा इशारा डॉ.माने यांनी दिला.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी भिमा कोरेगावप्रकरणी दलितांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली. मात्र आतापर्यंत किती जणांवरील गुन्हे मागे घेतले, याची आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी सादर करावी, तसेच अॅट्रासिटी अॅक्टच्या अनुषंगाने शासनाने अध्यादेश काढून कायदा अधिक मजबूत करावा, अशी मागणी डॉ.सुरेश माने यांनी केली. भाजपशासित प्रदेशांमध्ये दलितांवर अत्याचार होत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

सुरजागड लोहप्रकल्पासंबंधी जनतेच्या भावना शासनाने लक्षात घ्याव्यात आणि तेंदू लिलावांना कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्याने पालकमंत्र्यांनी लक्ष घालून शासनाने लोकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी डॉ.माने यांनी केली. शिक्षण, नोकरी व राजकारणात बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारावर पद बळकावणाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी करावी, असेही ते म्हणाले. भाजप व काँग्रेसचे मूळ धोरण सारखेच आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या बरोबर न जाता तिसरी आघाडी स्थापन करण्यात येणार असून, येत्या २५ एप्रिलला मुंबईत समविचारी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावल्याची माहिती डॉ.माने यांनी दिली. भिमा कोरेगाव व अॅट्रासिटी अॅक्टच्या अनुषंगाने दलितांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. हा असंतुष्ट मते कुणाच्या पारड्यात जातील, असा प्रश्न विचारला असता डॉ.माने यांनी दलित समाज केवळ बीआरएसपी व भारिप बहुजन महासंघ या दोनच पक्षांच्या बाजूने निवडणुकीच्या वेळी दिसेल, असे आत्मविश्वासाने सांगितले. हा समाज आठवले, कवाडे किंवा अन्य नेत्यांच्या बाजूने जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
7ZEUQ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना