गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार कोनसरी लोहप्रकल्पातील शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण

Saturday, 14th April 2018 07:51:24 PM

गडचिरोली, ता.१५: लॉयड मेटल्स कंपनीच्या कोनसरी येथील प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पासाठी जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात येणार आहे. यामुळे कोनसरी येथे होणाऱ्या लोहप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून, सुमारे ८०० सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील पहाडावरील लोहखनिजाची लीज मिळाल्यानंतर लॉयड मेटल्स कंपनीने चामोर्शी तालुक्यातील आष्टीनजीकच्या कोनसरी येथे लोहप्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने लॉयडने जवळपास ३५ शेतकऱ्यांची सुमारे ५०.२९ हेक्टर शेतजमीन संपादित करुन जमिनीच्या एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम २६ एप्रिल २०१७ रोजी धनादेशाद्वारे एमआयडीसीला दिली होती. एमआयडीसीने ही रक्कम शेतकऱ्यांना दिली. त्यानंतर १२ मे २०१७ रोजी कोनसरी येथे प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळीही प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वितरीत करण्यात आले होते. 

पुढे ७ फेब्रुवारी २०१८ रोजी एमआयडीसीने संबंधित शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात रक्कम देण्याविषयीचे पत्र लॉयड मेटल्स कंपनीला दिले. या पत्राची दखल घेत लॉयड मेटल्स कंपनीने ८ फेब्रुवारी २०१८ रोजी तत्काळ ६ कोटी १ लाख ६९ हजार ८१८ रुपये एमआयडीसीकडे आरटीजीएस केले. तसेच २० फेब्रुवारी २०१८ मुंबईत झालेल्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीशी राज्य शासनाने करार केल्यानंतर आता प्रथमच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात येणार आहे. यामुळे जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या असून, रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  .


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
MJ5K4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना