शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

शेतकऱ्यांना लाईनीत उभे करणाऱ्या सरकारला पाईपलाईनमध्ये टाका:नाना पटोले

Monday, 16th April 2018 05:28:07 AM

गडचिरोली, ता.१६: ३४ हजार कोटीची कर्जमाफी केल्याचे सांगणाऱ्या सरकारकडे कर्जमाफीची माहितीच उपलब्ध नाही. सरकारने सरसकट कर्जमाफी तर केलीच नाही; उलट ६७ वेळा धोरण बदलून शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रचंड त्रास दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना लाईनीत उभे करणाऱ्या सरकारला आगामी निवडणुकीत पाईपलाईनमध्ये टाका, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केले.

नाना पटोले यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी, मजूर व बेरोजगारांचा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.

या मोर्चात युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रतिभा रघुवंशी, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार डॉ.अविनाश वारजुकर, पक्ष निरीक्षक सुरेश भोयर, प्रफुल्ल गुडधे पाटील, जिया पटेल, रवींद्र दरेकर, हसनअली गिलानी, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, नरेंद्र जिचकार, डॉ.नामदेव किरसान, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजुकर, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रा.राजेश कांबळे, नितीन कुंभलकर, श्री.सेठिये आदी मान्यवर सहभागी झाले होते. दुपारी १ वाजता इंदिरा गांधी चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. नाना पटोले व अन्य नेत्यांनी बैलगाडीवर उभे राहून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तेथे जाहीर सभा झाली.

या सभेला संबोधित करताना नाना पटोले यांनी अनेकदा फडणवीस सरकारचा उल्लेख 'फसणवीस' सरकार असा केला. ते म्हणाले, या सरकारने पेसा कायदा रद्द केला नाही. आदिवासी आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं काम हे सरकार करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. खुर्चीचं मोठेपण मुख्यमंत्र्यांना टिकवून ठेवता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु नोटाबंदीनंतर प्रत्यक्षात एकट्या महाराष्ट्रात ७ हजार उद्योग बंद पडले. शिवाय वर्ग ३ व वर्ग ४ च्या पदांची नोकरभरती बंद केली. यामुळे बेरोजगार हताश आहे. महागाई वाढली आहे. शेतमालाला भाव नाही. धान, सोयाबीनचे भाव पडले आहेत. त्यामुळे अशा सरकारला जागा दाखवून द्या, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.

माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी म्हणाले की, हे सरकार कमिशनखोर सरकार आहे. बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, स्मार्ट सिटी अशा शेतकरी आणि सामान्य जनतेला नको असलेल्या गोष्टींमध्ये सरकारचा रस आहे. देशात दररोज महिला आणि मुलींवर बलात्कार होत आहेत, त्याचा भाजप नेते आत्मक्लेश करीत नाही. मात्र, लोकांच्या प्रश्नासाठी सरकारला धारेवर धरल्याबद्दल हे लोक उपोषण करतात. त्यामुळे हे खोटारड्या लोकांचे सरकार आहे, अशी टीका डॉ.उसेंडी यांनी केली. एकीकडे नोकरभरती नाही. तेंदू व्यवसायातून गोरगरिबांना रोजगार मिळतो. परंतु सरकारने तेंदूवरही जीएसटी लावल्याने कंत्राटदारांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. यावरुन गोरगरिबांचा रोजगार हिसकावण्याचे काम सरकार करीत आहे. शिवाय शाळा बंद करुन शिक्षणाची दारे बंद करण्याचा विडा सरकारने उचलला आहे, असा आरोप डॉ.उसेंडी यांनी केला.

युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रतिभा रघुवंशी यांनी महिलांवर बलात्कार करणाऱ्या आपल्या पदाधिकाऱ्यांना भाजप संरक्षण देत असल्याचा आरोप केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी युवकांना पक्षात महत्त्व दिल्याने युवक कार्यकर्त्यांनी लोकांच्या प्रश्नांवर लढा द्यावा, असे आवाहन रघुवंशी यांनी केले.

काँग्रेसचे प्रदेश सचिव रवींद्र दरेकर यांनीही सरकारवर टीका केली. भाजप सरकारच्या काळात महिलांवर अत्याचार होत आहेत आणि सरकार बलात्काऱ्यांना पाठीशी घालत आहे, असे ते म्हणाले. माजी आमदार आनंदराव गेडाम म्हणाले की, धानाला भाव नाही आणि बोनसही नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही. जीएसटीमुळे सामान्य व्यापारी त्रस्त आहेत. प्रफुल्ल गुडधे पाटील हेही सरकारवर बरसले. मोदींनी एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. सरकार विकासाचा गवगवा करीत आहे. मात्र, बेरोजगारांच्या हाताला काम नाही. विकासात युवकांची भागीदारी कुठे आहे, असा सवाल श्री.गुडधे यांनी केला. माजी आमदार डॉ.अविनाश वारजुकर म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अत्यंत वाईट परिस्थितीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु सरकार शेतमालाला भाव देत नसून, त्यांची थट्टा चालवीत आहे, असा आरोप डॉ.वारजुकर यांनी केला.

प्रास्ताविकात महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जिल्ह्याच्या समस्यांबाबत माहिती देऊन सरकारवर टीका केली. सभेचे संचालन हसनअली गिलानी यांनी केले. सभेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
LWH2K
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना