/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
जयन्त निमगडे/गडचिरोली, ता.१९: अगदी सकाळी कॉम्प्लेक्स परिसरातील स्मृती उद्यानात गेलात तर तेथे तुम्हाला एक गृहस्थ साफसफाई करताना दिसेल. साधा शर्ट आणि फुलपँट घातलेला हा माणूस कधी कचरा उचलत असतो, तर कधी हातात फावडा घेऊन गवत काढताना दिसतो. कुणाला वाटेल हा मनुष्य उद्यानातील मजूर असेल, तर कुणी त्याला वेड्यात काढत असतील. पण नाही; हा कुणी साधासुधा माणूस नाही. तो आहे एका आयएएस अधिकाऱ्याचा बाप!
होय, गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनू गोयल यांचे वडील प्रकाशचंद्र अग्रवाल! दोन वर्षांपूर्वी शांतनू गोयल गडचिरोलीचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून रुजू झाले. श्री.गोयल यांनी आपल्या आई-वडिलांनाही येथे सोबत आणले. हळूहळू या आयएएस अधिकाऱ्याचा बाप लोकांमध्ये मिसळू लागला. मुलगा आयएएस अधिकारी असल्याचा या बापाला अभिनिवेश नाही की, कुठला बडेजावही नाही. सदा हसतमुख, अत्यंत साधी राहणी आणि सामान्य लोकांशी संवाद हा या गृहस्थाचा स्वभावधर्म. त्यामुळे गडचिरोलीला आल्याआल्याच त्यांनी शहराला रपेट मारणे सुरु केले. ज्या भागात मोठे अधिकारी व न्यायाधिशांचे बंगले आहेत; त्याच भागात वनविभागाने स्मृती उद्यान विकसित केले आहे. अनेक अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि गावातील मुले, मुली तेथे फिरावयास जातात. एकदा प्रकाशचंद्र अग्रवालन हेदेखील तेथे गेले आणि या उद्यानाने त्यांना भुरळ घातली. दररोज साफसफाई करण्याचा विडा त्यांनी उचलला. सकाळ झाली की, ते या उद्यानात पोहचतात. उद्यानातील कचरा उचलतात. कधी फावड्याने वाढलेले अनावश्यक गवत काढतात, तर कधी झाडांना पाणी घालतात. श्रमदान आटोपले की ते मुला-मुलींना व्हॉलिबॉल खेळायला शिकवितात आणि स्वत:ही खेळतात. ये-जा करणारे त्यांच्याकडे कुतुहलाने बघत असतात. पण, अगदी फारच कमी लोकांना माहित आहे की, हा मनुष्य आयएएस अधिकाऱ्याचा वडील आहे म्हणून. रविवारी ते आपल्या अर्धांगिणीसह उद्यानात पोहचतात. तेथे दोघेही जण स्वच्छता करतात आणि इतरानाही स्वच्छतेसाठी प्रोत्साहित करतात. रस्त्यावरुन चालताना एखाद्या ठिकाणी कचरा दिसला की, तो उचलून विशिष्ट ठिकाणी ठेवल्याशिवाय प्रकाशचंद्रांना स्वस्थ बसवत नाही. १५ एप्रिलला त्यांनी स्मृती उद्यानात येणाऱ्या सहकाऱ्यांच्या मदतीने तेथे शंभर वृक्षांची लागवड केली. प्रकाशचंद्रांचे काम बघून कधी लहान मुले स्वत:हून त्यांच्या मदतीला धावतात, तर कधी एखादा बुजुर्ग माणूस श्रमदान करण्यास पुढे सरसावतो. "स्वत:पासून सुरुवात करा. लोक तुमच्याशी जुळत जातील", असे त्यांचे म्हणणे आहे. एक-दोन महिन्यांनी मुलाची बदली झाल्यानंतर मीदेखील जाणार आहे. मात्र श्रमदान आणि स्वच्छतेचे काम पुढेही सुरुच राहावे, एवढीच माफक अपेक्षा त्यांना आहे.
प्रकाशचंद्र अग्रवाल नुसती साफसफाईच करीत नाही, तर ते आपल्या मुलाच्या बंगल्यावर विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग घेतात आणि तेही अगदी फुकट! त्यासाठी त्यांनी उद्यानात येणाऱ्या मुलांशी संवाद साधला आणि शिकवणी वर्गाला येण्यास सांगितले. त्यांच्या लडीवाळ शब्दांनी मुलामुलींना सीईओंच्या बंगल्यावर येता आले. आता जवळपास ३० बालगोपाल फुकट शिकवणीचा लाभ घेताहेत. विसापूर, पोलिस वसाहत व जवळच्या परिसरातील ही मुले आहेत. बहुतांश मुले मराठी माध्यमातील आहेत. त्यातील ४ मुले नवोयदच्या परिक्षेला बसली आहेत. त्यातील तिघे जण आणि शिष्यवृत्तीचे तिघे जण निश्चितपणे परीक्षा उत्तीर्ण होतील. ही मुले नापास झाली तर मी नापास झालो, असा त्याचा अर्थ होईल, असे प्रकाशचंद्रजी सांगतात. इकडची भाषा मराठी असल्याने त्यांनी मराठी शिकण्यासही प्रारंभ केला.
विद्यार्थ्यांसाठी बंगल्यातच त्यांनी एक स्वतंत्र क्लासरुम तयार केली आहे. तेथे ते या मुलांना इंग्रजी, गणित व विज्ञानाचे धडे देतात. अकरावीतील काही मुलेही आता येऊ लागली आहेत. कुणाला डॉक्टर व्हायचे आहे, तर कुणाला इंजिनिअर. हा आत्मविश्वास अवघ्या काही दिवसांतच प्रकाशचंद्रांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. सकाळी १० वाजल्यापासून दिवसभर हा अध्यापनाचा सिलसिला सुरु असतो. एक-दोन दिवस एखादा विद्यार्थी वर्गात आला नाही तर प्रकाशचंद्रजी त्याचे घर गाठून विचारपूस करतात. त्यांची विद्यार्थ्यांना समजून घेण्याची पद्धतच न्यारी आहे. म्हणूनच इंग्रजी आणि गणितात कच्चे बच्चे आता पक्के होऊ लागले आहेत. यावर ते म्हणतात, "छात्रों को पढाया नहीं जाता, उनको मोटिवेट किया जाता हैं. मैं उनको सपने दिखाता हूं"
प्रत्येकच जण मोठा व्यक्ती होऊ शकतो. त्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते, असे प्रकाशचंद्रांना वाटते. याच विचाराने त्यांनी गडचिरोलीतील अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये स्वत:च जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
काही दिवसांपूर्वी गडचिरोलीतील कृषी विज्ञान केंद्रापुढे शासनाने कृषी प्रदर्शन भरविले होते. हे प्रदर्शन बघण्याची प्रकाशचंद्र अग्रवाल यांची इच्छा झाली. लगेच सीईओ शांतनू गोयल यांनी त्यांना प्रदर्शन बघण्यासाठी पाठविले. सीईओ साहेबांचे वडील आल्याचे माहित होताच प्रदर्शनात उपस्थित कर्मचारी मदतीला धावले. त्यांनी प्रकाशचंद्र अग्रवाल यांना संपूर्ण प्रदर्शनाची प्रदक्षिणा घालून दिली. प्रकाशचंद्रांनी एकेक वस्तूचे बारकाईने निरीक्षण करुन त्या वस्तू तयार करणाऱ्यांशी संवादही साधला. काही बचत गटाच्या महिला एटापल्ली व भामरागडसारख्या दुर्गम भागातून आल्या होत्या. त्यांच्या कार्याने ते प्रभावीत झाले. एवढ्यात एका कर्मचाऱ्याने भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावाच्या परिसरातील फोटो दाखविले. या गावांची परिस्थिती अत्यंत विदारक असल्याचे त्या कर्मचाऱ्याने सांगितले. यावर सीईओ शांतनू गोयल यांच्या वडिलांनी काय म्हणावे? ते म्हणाले, "यह मेरे बेटे की गलती है"
मेकॅनिकल इंजिनिअर आहेत प्रकाशचंद्र अग्रवाल
मूळचे उत्तरप्रदेशातील कानपूर येथील रहिवासी असलेले ६३ वर्षीय प्रकाशचंद्र अग्रवाल मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. एका नामांकित कंपनीत ४० वर्षे सेवा दिल्यानंतर २०१५ मध्ये ते उच्च पदावरुन रिटायर्ड झाले. परंतु 'रिटायर्ड' या शब्दावर त्यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, "मैं सेवानिवृत्त हुआँ हूं, रिटायर्ड नहीं!" पुत्र शांतनू गोयल यांची बुद्धिमत्ता आणि काम करण्याच्या पद्धतीचा त्यांना अभिमान आहे. कुठे माजी मालगुजारी तलावाच्या खोलीकरणाचे काम असेल, कुठे गोदामाचे काम असेल, तेथे माझा मुलगा प्रत्यक्ष भेट देऊन काम बघतो, याचे समाधान आहे, असे ते नम्रपणे म्हणाले. आम्ही एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करीत नाही. मात्र, ''मैं आलोचक हूं." असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.