शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Friday, 27th April 2018 07:13:43 AM

गडचिरोली, ता.२७: आई व मैत्रिणीसोबत बँकेत आधार कार्ड लिंक करण्यासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस येथील विशेष सत्र न्यायालयाने ५ वर्षांचा सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. संजय सोमा मेश्राम रा.गडचिरोली असे दोषी इसमाचे नाव आहे.

२८ डिसेंबर २०१७ ची ही गोष्ट आहे. या दिवशी दुपारी ३ पीडित मुलगी तिची आई व मैत्रिणीसह बँकेत आधार कार्ड लिंक करण्यासाठी जात होती. त्यावेळी घराशेजारी राहणारा संजय मेश्राम याने पीडित मुलीची मान व कंबर पकडून तिला खाली पाडले. आईने तिची कशीबशी सुटका केली. मात्र, आरोपीने तिच्या आईलाही खाली पाडले. त्यानंतर पीडित मुलगी शेजारच्या घरी गेली. आईने वडिलांना बोलावल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी संजय मेश्राम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण झाल्यावर पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. विशेष सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी संजय मेश्राम यास भादंवि कलम ३५४ अन्वये ५ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, बालकाच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलम ७, ८ अन्वये दोषी ठरवून ५ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, कलम ३५४(डी)(१)(आय)अन्वये ३ वर्षांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड व कलम ५०९ अन्वये ३ वर्षांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. 

कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
MZZ4S
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना