शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

१०२ आदिवासी जोडपी थाटामाटात झाले विवाहबद्ध

Sunday, 29th April 2018 05:55:51 AM

गडचिरोली, ता.२९: साधारणत: दुर्गम भागात सोयीसुविधांचा अभाव असलेल्या गावात निवडक नातेवाईक व गावकऱ्यांच्या उपस्थितीत आदिवासी जोडप्यांचे विवाह लावले जातात. परंतु आज येथील अभिनव लॉनवर तब्बल १०२ आदिवासी जोडपी आपली परंपरा व रितीरिवाज कायम ठेवत थाटामाटात लग्नाच्या बेडीत अडकली. नवरदेव-नवरींच्या आप्तेष्टांसह हजारो नागरिकांना या अभिनव विवाह सोहळ्याचा आनंद लुटता आला.

नागपूर येथील मैत्री परिवार, पोलिस अधीक्षक कार्यालय गडचिरोली, धर्मादाय आयुक्त नागपूर आणि साईभक्त सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खा.अशोक नेते, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, धर्मादाय आयुक्त श्री.सातव, मैत्री संस्थेचे संजय भेंडे, सचिव प्रा.प्रमोद पेंडके, नगराध्यक्ष योगीता पिपरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.महेंद्र पंडित, डॉ.हरी बालाजी, प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष निरंजन वासेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सजविलेल्या ३० ट्रॅक्टरमधून सकाळी १० वाजता इंदिरा गांधी चौकातून वर-वधूंची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सर्वजण नियोजित स्थळी विराजमान झाले. आदिवासींच्या परंपरेला धक्का न लावता रितीरिवाजानुसार गोंडी भाषेतील मंगलाष्टके गात पुष्पांची उधळण करीत १०२ जोडपी विवाहबद्ध झाली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो आदिवासी नागरिकांसह नागपूर व अन्य ठिकाणचे मान्यवर आणि अधिकाऱ्यांनाही या सोहळ्याचे साक्षदार होता आले.

यावेळी खा.नेते म्हणाले की, अशाप्रकारच्या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे पालकांचा वेळ व पैशाची खूप बचत होते. सामूहिक विवाह सोहळे सर्वत्र झाले पाहिजेत. आजचा सोहळा मैत्री संस्था व पोलिस विभागाने आयोजित केल्याबद्दल खा.नेते यांनी त्यांचे कौतुक केले.

जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले की, मैत्री संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद असून, गरीब आदिवासींचा विवाह लावून दिल्याने त्यांची आर्थिक बचत झाली आहे. प्रशासन  नेहमीच आदिवासींच्या पाठीशी आहे. अनेक नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला. यातील काही आत्मसमर्पितांनी आपला जोडीदार निवडून सांसारिक जीवनात पदार्पण केल्याबद्दल श्री.सिंह यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. 

पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख म्हणाले की, आदिवासींच्या परंपरेनुसार त्यांचा विवाह लावून देण्यात येत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील वर-वधू यात सहभागी झाले आहेत.  संजय भेंडे यांनी या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुभेच्छा दिल्याचे सांगितले. भविष्यात आणखी सोहळे आयोजित केले जातील. ३० ट्रॅक्टर, प्रत्येक विवाहित जोडप्यास ४५ हजार रुपयांचा अहेर, सोन्याचे मंगळसूत्र, आईवडिलांना कपडे देण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

या सोहळ्यात आत्मसमर्पित नक्षलवादी सैनू झुरु वेळदा उर्फ मिरगू(३५) व रुपी कांडे नरोटीे उर्फ झुरी(३६), तसेच अर्जुन बारसाय पोया उर्फ नरेश(२५) व छाया देवू कुळयेटी(२३) हे विवाहबद्ध झाले. मान्यवरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0KEAZ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना