मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

सत्ताधारी जमात होण्यासाठी जातीअंताची लढाई लढावीच लागेल:दिलीप सोळंके

Wednesday, 16th May 2018 07:48:53 AM

गडचिरोली, ता.१६: बहुजनांमधील लोक मंत्री होणे म्हणजे सत्ता नव्हे. सामाजिक जोखडातून जेव्हा समाज मुक्त होतो; तेव्हाच राज्यक्रांती होत असते. म्हणून सत्ताधारी जमात बनून राज्यक्रांती यशस्वी करायची असेल, तर जातीअंताची लढाई लढावीच लागेल, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत व वक्ते दिलीप सोळंके यांनी केले.

राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या वतीने छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील सभागृहात आयोजित प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.बबनराव तायवाडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.शेषराव येलेकर व अरुण मुनघाटे उपस्थित होते.

दिलीप सोळंके पुढे म्हणाले, गेल्या ७० वर्षात ओबीसी समाज स्वत:च्या हक्काचा राजकीय पक्ष उभा करु शकला नाही. तो जाती-जातीत व पक्षा-पक्षात विभागला गेला आहे. हा समाज सांस्कृतिक गुलामगिरीत असल्यामुळे ओबीसींचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले नाही. ओबीसींनी नेहमीच व्यवहार आणि गरजेपेक्षा भावनेला अधिक महत्त्व दिले. या समाजाने सातत्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांकडे दुर्लक्ष केले. तो समाजप्रबोधनापासूनही दूर राहिला. त्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला ओबीसी तरुण कुंडली पाहण्यासाठी ७ वा वर्ग शिकलेल्या भटजीकडे जातो. शिकलेली मंडळीदेखील तार्किकदृष्ट्या विचार करीत नाही, त्यामुळे 'देव' ही त्यांची गरज बनत गेली आणि ते सांस्कृतिक गुलामगिरीत अडकत गेले. त्यामुळे हा समाज सांस्कृतिक गुलामगिरी तोडेल ही अपेक्षा येथेच फोल ठरते, असे श्री.सोळंके म्हणाले.

ओबीसी समाज धर्माधिष्ठित राजकारण करीत राहिला. सामाजिक व्यवस्था ही कॅरमबोर्ड सारखी आहे. कॅरम बोर्डाला चार छिद्रे असतात. सामाजिक व्यवस्थेच्या बोर्डालाही अशीच चार छिद्रे आहेत. त्यातील एक छिद्र धर्माचं आहे. मनुवाद्यांनी ओबीसींना याच छिद्रात टाकण्याचे काम केले. राज्य करायचे असेल तर शत्रू निर्माण करा, या गोबेल्सच्या सूत्राचा वापर मनुवादी लोक करीत राहिले आणि ओबीसी माणूस त्याला बळी पडत राहिला, असे दिलीप सोळंके यांनी विविध दाखले देत स्पष्ट केले. मागील ७० वर्षांत लोकशाहीचा पहिला अंक संपला. आता दुसरा अंक सुरु आहे. ओबीसी असाच झोपून राहिला, तर तिसरा अंक हा संविधानाला निरोप देणारा असेल,अशी भीती व्यक्त करुन श्री.सोळंके यांनी सत्ताधारी जमात व्हायचे असेल, तर जातीअंताची लढाई लढावीच लागेल, असे आग्रही प्रतिपादन केले.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी मंडल आयोगाच्या लढ्याची पार्श्वभूमी विशद करुन ओबीसींनी स्वतंत्र अस्मिता निर्माण करण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवरायांनी गौतम बुद्धापासून प्रेरणा घेऊन स्वराज्य निर्माण केले. परंतु ओबीसी समाज प्रबोधनकारांचं ऐकत नाही, तर नेत्यांचं ऐकतो. म्हणून या समाजाची दुर्दशा आहे, असे डॉ.तायवाडे म्हणाले. ओबीसींच्या हितासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ प्रयत्नशील असून, या बॅनरखाली ओबीसींनी एकत्र यावे, असे आवाहन डॉ.तायवाडे यांनी केले. याप्रसंगी प्रा.शेषराव येलेकर यांचेही भाषण झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुचित वांढरे यांनी केले. संचालन परमानंद पुन्नमवार, तर आभार प्रदर्शन चंचल रोहनकर यांनी केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
G6L70
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना