मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

एनकाउंटरच्या २३ दिवसांनंतरही गट्टेपल्लीत दहशत

Thursday, 17th May 2018 12:07:48 AM

गट्टेपल्ली, ता.१७: आजपासून बरोबर २३ दिवसांपूर्वी भामरागडनजीकच्या कसनासूर गावात नक्षल्यांचे एनकाउंटर झाले. त्यात ४० नक्षलवादी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला. मात्र, मृत नक्षल्यांमध्ये गट्टेपल्ली येथील ८ निरपराध युवक-युवतीही होते. हे युवक, युवती नक्षलवादी नव्हतेच, असे गावकरी छाती ठोकून सांगत असले, तरी पोलिस मात्र त्यावर काहीही बोलायला तयार नाहीत. सद्य:स्थितीत अख्खे गट्टेपल्ली गाव भयग्रस्त असून, आमच्या निरपराध मुलामुलींचा जीव कोण परत आणणार, असा सवाल गावकरी पाणावलेल्या डोळ्यांनी करीत आहेत.

२२ एप्रिलच्या सकाळी भामरागड तालुक्यातील ताडगावनजीकच्या कसनासूर-बोरिया जंगलात चकमक झाल्याची बातमी आली. सुरुवातीला ८, नंतर १५, पुढे १६ असे करताकरता मृतांचा आकडा ४० वर पोहचला. या चकमकीतील महाआश्चर्य म्हणजे एकाही पोलिसाला साधे खरचटलेसुद्धा नाही. घटनेनंतर गट्टेपल्ली येथील ८ युवक-युवती बेपत्ता असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गट्टेपल्ली हे गाव देशभरात चर्चेला आले. नेमके काय घडले, हे जाणून घेण्यासाठी मंगळवारी(ता.१५) पत्रकारांच्या चमूने गट्टेपल्लीत जाऊन परिस्थिती जाणून घेतली. 

आलापल्ली-भामरागड मार्गावर चंद्रा गावाच्या उत्तरेला ३ किलोमीटर अंतरावर गट्टेपल्ली हे गाव आहे. गावात जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. गर्द झाडीच्या कुशीत वसलेल्या या गावची लोकसंख्या आहे २८०. गावातील बहुतांश नागरिक माडिया. गावात चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेत दोन 'गुर्जी' आहेत. पण, दोन्ही गुर्जी अमावस्ये-पौर्णिमेलाच शाळा उघडतात. कुणी विचारलेच तर 'मिटींग आहे' हे त्यांचे उत्तर ठरलेले. त्यामुळे काही पालक कांदोळी, बुर्गी, पेरमिली, ताडगाव इत्यादी गावांमध्ये मुलांना शिकण्यासाठी पाठवतात. गावात एक आरोग्य उपकेंद्र आहे. मात्र, एकमेव परिचारिका सहा महिन्यांपासून ट्रेनिंगवर आहे. गावात तीन विहिरी आणि एक हातपंप आहे. त्यावर सोलर पॅनल बसविलेला आहे. शंभर टक्के आदिवासींच्या गावातील हे सोलरपंप अजूनही व्यवस्थित आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही. गावात दहा-पंधरा जण दहावीपर्यंत पोहचले, तर ४-५ जणांनी बारावी गाठली. असे हे कुणाला सहजासहजी न दिसणारे गट्टेपल्ली गाव २२ एप्रिलच्या घटनेनंतर देशभरातील मीडियाच्या चर्चेत आले.

आम्ही गावकऱ्यांना बोलते केले, तेव्हा त्यांनी भीत भीत काही गोष्टी सांगितल्या. गट्टेपल्ली हे गाव एटापल्ली तालुक्यात आहे. या गावापासून भामरागड तालुक्यातील कसनासूर हे गाव १५ किलोमीटरवर आहे. काम असल्यास लोक जंगलातील शार्टकटने कसनासूरला जातात. घटनेच्या दिवशी कसनासूर गावात सोमा रैनू मडावी या युवकाचे लग्न होते. शनिवारी २१ एप्रिल २०१८ च्या संध्याकाळी गावातील इरपा वत्ते मडावी(१९), मंगेश पुंडू मडावी(१७), मंगेश बुकलू आत्राम(२२), कु.रासो पोचा मडावी(२१), कु.बुज्जी कर्वे उसेंडी(१७),कु.रासो चुक्कू मडावी(१५), कु.नुरसे पेडू मडावी(१९)व कु. अनिता देवू गावडे(१७) हे आठ जण कसनासूरला जायला निघाले. गावातील गोंगलू मुका गावडे व तुलसी चैतू गावडे हेही त्या लग्नाला गेले होते. गोंगलू व तुलसी लग्न लावून गावात परत आले. मात्र, आधी गेलेले ८ जण परत आले नाही. सर्वांच्या नातेवाईकांनी आठ जण दिसले काय, अशी विचारणा केली. परंतु त्यांची भेट झाली नाही, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी कसनासूरमध्ये चकमक होऊन १६ नक्षलवादी ठार झाल्याचे गावकऱ्यांना कळले. दोन दिवस होऊनही आमची मुले परत आली नाही, म्हणून नातेवाईकांनी पेरमिली पोलिस ठाण्यात तक्रार केली. तोपर्यंत सुरुवातीला ठार झालेल्या व्यक्तींचे फोटो व्हॉटस्अॅपवर व्हायरल झाले होते. मृतांपैकी एक युवती बुज्जी कर्वे उसेंडी हिच्यासारखी दिसत होती. बुज्जी उसेंडी घरुन गेली तेव्हा काळे ठिपके असलेला लाल रंगाचा सलवार परिधान करुन गेली होती. पोलिसांच्या आवाहनानंतर बुज्जीचे नातेवाईक पोलिसांकडे गेले. गडचिरोली पोलिसांनी त्यांनी 'मृतदेह क्रमांक ५' दाखविला. हाच मृतदेह बुज्जीचा असल्याची नातेवाईकांनी खात्री पटली. परंतु पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांना दिला नाही. त्यामुळे बुज्जीचा मृतदेह गडचिरोलीतच दफन करण्यात आला. बुज्जीचा मृत्यू झाला म्हणजे अन्य युवक, युवतींचाही मृत्यू तर झाला नाही ना, या शंकने गट्टेपल्लीचे नागरिक चिंतातूर झाले. त्यांनी पोलिसांना इतर मृतदेह दाखविण्याची विनंती केली. परंतु मृतदेह पाहण्यायोग्य नाहीत, असे कारण पुढे करुन पोलिसांनी मृतदेह दाखविले नाही, असा गंभीर आरोप गट्टेपल्लीच्या नागरिकांनी पत्रकारांपुढे केला.

पोलिसांनी मृतदेह दाखविले नाही. मग, आमची मुले ठार झाली की बेपत्ता आहेत, हे कसे समजायचे, असा गावकऱ्यांचा सवाल आहे. 

बेपत्ता असलेला इरपा वत्ते मडावी याने वर्षभरापूर्वी बारावीची परीक्षा दिली होती. मंगेश मडावी हा भामरागडच्या भगवंतराव उच्चमाध्यमिक आश्रमशाळेतून अकरावीची परीक्षा देऊन नुकताच परतला होता. हे विद्यार्थी त्यांच्या कुटुंबीयांसाठी आशेचे किरण होते. परंतु त्यांचाही एनकाउंटर करण्यात आला. चकमकीत ठार झालेला नक्षल्यांचा डीव्हीसी साईनाथ याचे गट्टेपल्ली हे गाव आहे. गावातील एका कोपऱ्यात साईनाथचे झोपडीवजा घर आहे. परंतु गावात येऊन त्याने कधी दमदाटी केली नाही, वा मुलांनाही सोबत नेले नाही. त्यामुळे आमच्या मुलांना नक्षलवादी ठरविण्याचा अधिकार इतरांना कुणी दिला, हा सवाल गट्टेपल्लीचे नागरिक अश्रू आटवून करीत आहेत. प्रशासनाला आज ना उद्या या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1LQC5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना