सोमवार, 18 जून 2018
लक्षवेधी :
  महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग यांचा एल्गार परिषदेशी संबंध नाही, त्यांची तत्काळ सुटका करा: भाकप व ग्रामसभांच्या नेत्यांची मागणी             कोनसरीतील लोहप्रकल्प सर्वांच्या सहकार्यामुळेच-सत्काराप्रसंगी आ.डॉ.देवराव होळी यांचे प्रतिपादन             गडचिरोली येथे कारमेल हायस्कूलच्या मागे नवीन घर विकणे आहे, १६०० स्क्वेअर फूट प्लॉट व १२०० स्क्वेअर फूट बांधकाम-संपर्क ७९७२८८०५१३             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट, शासनाचे १ कोटी रुपये पाण्यात?

Thursday, 7th June 2018 01:04:18 PM

गडचिरोली, ता.७: जलासंधारण विभागामार्फत धानोरा तालुक्यातील येरकडनजीकच्या नाल्यावर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम अत्यंत निकृ्ष्ट असून, हा बंधारा पावसाळ्यात कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अभियंत्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शासनाचे तब्बल १ कोटी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भूगर्भातील जलस्तर वाढावा, शेतीला सिंचनाची सोय व्हावी तसेच गुरांना उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची सोय व्हावी, यासाठी  जलसंधारण(लघुसिंचन)विभागामार्फत आवश्यक त्या ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात येतात. असाच एक बंधारा धानोरा तालुक्यातील येरकड गावापासून दक्षिणेस १ किलोमीटर अंतरावर बांधण्यात आला. जलसंधारण विभागाच्या गडचिरोली येथील उपविभागीय अभियंता कार्यालयामार्फत कंत्राटदाराकरवी या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. ९८ लाख ७६ हजार रुपये अंदाजपत्रकीय किमतीच्या या बंधाऱ्यास जिल्हाधिकाऱ्यांनी १२ सप्टेंबर २०१६ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान केली. पुढे या बंधाऱ्याच्या बांधकामासाठी कार्यकारी अभियंता, लघु सिंचन(जलसंधारण) विभाग चंद्रपूर यांनी संबंधित कंत्राटदाराची नियुक्ती करुन त्यास २० मार्च २०१७ ला कार्यारंभ आदेश दिला. त्यानंतर २०१७-१८ पासून या बंधाऱ्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. या बंधाऱ्याची लांबी ३९ मीटर व उंची दीड मीटर बंधाऱ्यात एकूण ९७.०९ स.घ.मीटर पाणीसाठा होऊन येरकड व कोसमटोला गावातील २५ ते ३० हेक्टर शेतजमिनीचे सिंचन अपेक्षित आहे.

परंतु प्रत्यक्षात बंधाऱ्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या बंधाऱ्याचा पाया किमान १५ फूट खोदून दोन्ही बाजूस काँक्रिटच्या भिंती, त्यात बोल्डर व काँक्रिट भरुन त्यावर रॉफ्टचे बांधकाम अपेक्षित होते. परंतु तसे न करता केवळ ४ ते ५ फूट पाया खोदून व काँक्रिट आणि बोल्डरचा भरणा न करताच रॉफ्ट टाकण्यात आला. बांधकाम करताना सिमेंट व लोखंडाचा वापर अत्यंत कमी करण्यात आला. नाल्यातीलच गाळाची वाळू काँक्रिटसाठी वापरण्यात येत होती. विशेष म्हणजे, हे बांधकाम सुरु असताना काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे कार्यकारी अभियंत्यांनी रॉफ्टचे बांधकाम तोडण्याचे आदेश संबंधित कंत्राटदार व उपविभागीय अभियंता मृद व जलसंधारण विभाग गडचिरोली यांना दिले होते. परंतु कार्यकारी अभियंत्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून रॉफ्टचे बांधकाम करण्यात आले. पुढे पावसाळा सुरु झाल्यामुळे काम बंद पडले.

नुकतीच प्रस्तुत प्रतिनिधीने बंधारास्थळी भेट देऊन बंधाऱ्याची पाहणी केली असता काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून आले. बंधाऱ्याच्या स्लॅब व कॉलममध्ये काँक्रिट भरताना सिमेंटचा वापर कमी व वाळूचा वापर अधिक करण्यात आला आहे. त्यामुळे हात लावला तरी प्लॉस्टर निघू लागते. स्लॅबमध्ये सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या कोंबण्यात आल्या आहेत. प्लॉस्टर चांगले न केल्याने गिट्टीही हातानेच बाहेर येते. बंधाऱ्याच्या तोंडावर दोन्ही बाजूला दगड टाकण्यात आले आहेत. मात्र, तेथे मुरुम न टाकता नुसतीच माती टाकण्यात आली आहे.

एकंदरीत हा पूल कम बंधारा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याने यंदाच्या पावसाळ्यात तो कोसळण्याची व बराचसा भाग वाहून जाण्याची शक्यता स्पष्टपणे दिसत आहे. पावसाळ्यात या बंधाऱ्यावर वाहतूक करणेही जीवघेणे ठरणार आहे. असे असतानाही या बंधाऱ्याच्या कामाचे सुमारे ९० लाख रुपये देयक अदा करण्यात आले आहे. या संपूर्ण बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. 

एकच बंधारा निकृष्ट कसा?-उपविभागीय अभियंता बरडे

येरकड येथील बंधाऱ्याचे काम निकृष्ट असल्याबाबत मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंत वाय.जी.बरडे यांना विचारणा केली असता त्यांनी 'उर्वरित सर्व बंधारे उत्कृष्ठ व येरकडचाच बंधारा निकृष्ट कसा?', असा उलट सवाल केला. मात्र, बंधाऱ्याच्या निकृष्ट बांधकामाचे फोटो दाखविताच श्री.बरडे गप्प झाले. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
D4130
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना