शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग यांची तत्काळ सुटका करा: भाकप व ग्रामसभांच्या नेत्यांची मागणी

Wednesday, 13th June 2018 04:20:05 AM

गडचिरोली, ता.१३: सामाजिक कार्यकर्ते महेश राऊत यांनी प्राईमिनिस्टर फेलो म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच अॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी गोरगरीब आदिवासींची न्यायालयीन लढाई लढून त्यांना न्याय मिळवून दिला. एल्गार परिषदेच्या आयोजनाशी त्यांचा कुठलाही संबंध नसून, ते निरपराध आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन त्यांची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी भाकप व ग्रामसभांच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेला भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.महेश कोपुलवार, ग्रामसभांचे नेते व जिल्हा परिषद सदस्य अॅड.लालसू नोगोटी, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार, आयटकचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, चंद्रभान मेश्राम, भामरागड पंचायत समितीचे सभापती सुखराम मडावी, हरिदास पदा, महेश राऊत यांची आई स्मिता राऊत, बहीण सोनाली राऊत, लक्ष्मी कुथे, भारिप-बमसंच्या नेत्या माला भजगवळी, इजामसाय काटेंगे, समरु कल्लो, झाडुराम हलामी, शीतल नैताम यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. 

लालसू नोगोटी यांनी सांगितले की, महेश राऊत हे २०११ ते २०१३ पर्यंत पीएमआरडी फेलो होते. या पदावर असताना त्यांनी जिल्ह्यात सामूहिक व वैयक्तिक वनहक्कांचे दावे मोठ्या प्रमाणावर मंजूर करण्यास प्रशासनाला भाग पाडून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला. राऊत यांनी ग्रामसभांना सक्षम बनवून पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती केली. ग्रामसभांच्या सहकार्याने त्यांनी खाणींना विरोध केला. त्यांच्या या संघर्षाला जगातील ७० संघटनांनी पाठिंबा दिला. हा आवाज दडपून टाकण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन अटक केली, असा आरोप अॅड.नोगोटी यांनी केला.

डॉ.महेश कोपुलवार म्हणाले की, महेश राऊत हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या नामांकित संस्थेचे विद्यार्थी आहेत. पीएमआरडी फेलो म्हणून गडचिरोली जिल्ह्यात काम करताना त्यांनी गोरगरीब नागरिकांच्या हिताची अनेक कामे केली. पेसा कायदा समजावून सांगण्यासाठी त्यांनी अनेकदा परिसंवाद आयोजित केले. नक्षल्यांचा निवडणुकांना विरोध असतानाही ग्रामसभा सक्षम करुन त्यांनी लोकांनी उभे केलेले उमेदवार निवडून यावेत, यासाठी प्रयत्न केले. भारत जनआंदोलन व विस्थापनविरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनी खाणींविरोधात लढा उभारला. अॅड.सुरेंद्र गडलिंग यांनी दलित, आदिवासींचे खटले लढवून अनेकांची खोट्या खटल्यांमधून सुटका केली. परंतु सरकार या लोकशाही मानणाऱ्या नेत्यांना अटक करुन जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप डॉ.कोपुलवार यांनी केला. या दोघांवरील गुन्हे तत्काळ मागे घेऊन त्यांची बिनशर्त सुटका करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

अमोल मारकवार यांनी सांगितले की, महेश राऊत व अॅड.गडलिंग यांचा एल्गार परिषदेशी काहीही संबंध नाही. तरीही पोलिस त्यांना अटक करतात आणि संभाजी भिडे व विनायक एकबोटे यांना मोकाट सोडतात, असा आरोपही मारकवार यांनी केला. 

माझा भाऊ निर्दोष: सोनाली राऊत

माझा भाऊ महेश राऊत यास आतड्यांचा विकार आहे. अटक होण्याच्या आदल्या दिवशी तो पुण्याहून उपचार करुन नागपूरला आला होता. आम्ही देसाईगंज येथील घरी असताना अगदी सकाळी ६ वाजता पोलिस आले. दुपारी दीड वाजतापर्यंत त्यांनी आमच्या घराची झडती घेतली. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य केले. झडती सुरु असतानाच सकाळी ८ वाजता महेशला नागपुरातून अटक केल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने मोबाईलवरुन दिली. महेशने गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचा एल्गार परिषद व नक्षल्यांशी काहीही संबंध नसताना पोलिसांनी अटक का केली, असा सवाल सोनालीने केला. यावेळी महेशची आई स्मिता राऊत यांनीही माझा मुलगा निर्दोष असून, त्याची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
I1ARK
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना