मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

मामा तलावांच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट; शासनाच्या उद्देशाची झाली 'माती'!

Friday, 22nd June 2018 08:22:04 AM

गडचिरोली, ता.२२: 'माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन अभियान' या कार्यक्रमांतर्गत कुरखेडा तालुक्यातील पाच ठिकाणच्या तलावांच्या दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याने शासनाच्या उद्देशाची माती झाली आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या चार जिल्ह्यांतील संपूर्ण भाग हा 'रुपांतरीत खडक' या प्रकारचा आहे. पाऊस कितीही पडला तरी जमिनीत फार कमी पाणी मुरणे, हे या भूस्तराचे वैशिष्ट्य आहे. अशा या जिल्ह्यांमध्ये धान(भात)हे प्रमुख खरीप पीक घेतले जाते. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत येथे सरासरी पाऊस पडतो. परंतु जेव्हा पिकाला पाण्याची आवश्यकता भासते; त्याचवेळी बरेचदा पावसात खंड पडतो. पावसाच्या या अनियमिततेवर मात करुन संरक्षित सिंचन प्रदान करण्याच्या हेतूने सुमारे ३०० वर्षापूर्वी गोंड राजांच्या कारकिर्दीत ३१ हजार ९०० हेक्टर सिंचन क्षमतेचे ६७०० तलाव बांधण्यात आले. ब्रिटीश काळात या तलावांची मालकी मालगुजारांकडे होती. पुढे स्वातंत्र्यानंतर १९५० मध्ये शासनाने हे तलाव मालगुजारांकडून ताब्यात घेतले. तेव्हापासून या तलावांना 'माजी मालगुजारी तलाव' असे संबोधण्यात येऊ लागले. या तलावांपैकी एकट्या गडचिरोली जिल्ह्यात १६४५ तलाव आहेत. शून्य ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेचे तलाव जिल्हा परिषदेकडे, तर शंभर हेक्टरहून अधिक सिंचन क्षमतेचे तलाव जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. 

या माजी मालगुजारी तलावांचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्यासाठी ३ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार अॅड.मधुकरराव किंमतकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीने २०१२ मध्ये आपला अहवाल शासनाकडे सादर केला. सद्य:स्थितीत जिल्हा परिषदांकडे व्यवस्थापनाकरिता असलेले बहुतांश तलाव जीर्ण अवस्थेत असून, त्यांची क्षती झाली आहे. त्यामुळे या तलावांची विशेष दुरुस्ती व पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात यावे, अशी शिफारस अॅड.मधुकरराव किंमतकर यांच्या समितीने केली होती. त्याअनुषंगाने शासनाने 'माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन अभियान' कार्यक्रम सुरु केला. या अभियानांतर्गत तलावांचे खोलीकरण, गाळ काढणे, गेटची दुरुस्ती व नवीन बांधकाम, वेस्ट वेअरची दुरुस्ती व नवीन बांधकाम, कालवे व कालव्यावरील बांधकामाची दुरुस्ती आणि नवीन बांधकाम, मत्स्यतळी खोदकाम इत्यादी कामे हाती घेण्यात आली आहेत.

या कामांमुळे तलावांची सिंचन क्षमता वाढून शेती व गुरांना पाण्याची सोय होईल, तलावातील गाळ काढून तो शेतात टाकल्यामुळे शेतीतील जमिनीचा पोत सुधारुन उत्पादन वाढेल, मत्स्यतळ्यांमुळे शेतकरी मत्स्यउत्पादन घेतील व त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल असा विश्वास शासनासह शेतकऱ्यांनाही वाटू लागला. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात मात्र प्रत्यक्षात वेगळे घडले.

गडचिरोली येथील उपविभागीय मृद व जलसंधारण अधिकारी कार्यालयामार्फत मागील वर्षीपासून कुरखेडा तालुक्यातील शिरपूर येथील सर्वे क्रमांक १०९ व १११, खैरी येथील सर्वे क्रमांक १४० व १४१, घाटी येथील सर्वे क्रमांक १९३, कढोली येथील सर्वे क्रमांक ३०५ व उराडी येथील सर्वे क्रमांक ३८१ या माजी मालगुजारी तलावांची अंदाजे २ कोटी रुपयांची कामे सुरु करण्यात आली. मागील वर्षी शिरपूर, खैरी व घाटी येथील तलावांच्या पाळीचे मातीकाम, खोलीकरण व मत्स्यतळी खोदकाम इत्यादी कामे करण्यात आली.  परंतु प्रत्येक तलावाच्या पाळीवर १५ ते २० हजार घनमीटर मातीकाम करण्याऐवजी केवळ ३ ते ४ हजार घनमीटर माती टाकून खोदकामातील माती तलावाबाहेर फेकण्यात आली. खोलीकरण व मत्स्यतळ्यांची कामे अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात आली नाहीत. मत्स्यतळी २ मीटर खोल खोदण्याऐवजी केवळ दीड मीटर खोदून ती अडीच मीटर खोदल्याचे दर्शविण्यात आले. तलावाचे खोलीकरण व्यवस्थित करण्यात आले नाही. तलावाच्या पाळीवर २० मीटर जाडीचा मुरुमाचा थर टाकणे गरजेचे होते;परंतु तोही नाममात्र टाकण्यात आला. तलावाच्या पाळीला २३ सेंटिमीटर जाडीची पिचींग करण्याऐवजी लहान बोल्डरची १० ते १५ सेंटिमीटर जाडीची पिचींग करण्यात आली.

शिरपूर येथील तलावाला बांधण्यात आलेल्या तीनही गेटची उंची कमी असून त्यावर बसविण्यात येणारे चॅनल अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. या गेटवर एक ते दीड मीटर पाणी राहत असल्याने गेट उघडायचा कसा, असा प्रश्न गावकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे, तर गेट क्रमांक तीनमधून नव्याने काढण्यात आलेल्या ३० मीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या कॅनलची उंची फार कमी असल्याने समोरच्या शेतात पाणी जाऊ शकत नसेल तर लाखो रुपये खर्च झालेल्या या तलावाचा शेतकऱ्यांना काय उपयोग? असा प्रश्न शिरपूरच्या गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

अशीच थातूरमातूर कामे कढोली व उराडी येथील तलावांची करण्यात आल्याचे दिसून आले. कामे योग्यरितीने न करताही देयक काढण्यासाठी आटापिटा करण्यात आला. यावरुन या पाचही तलावांच्या कामात मोठी अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे. शासनाने या संपूर्ण कामांची नि:पक्ष चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

आ.क्रिष्णा गजबे यांनी घेतली तक्रारीची दखल

दरम्यान, शिरपूरवासीयांनी माजी मालगुजारी तलावांच्या निकृष्ट कामांची चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांच्याकडे केली होती. आ.गजबे यांनी या तक्रारीची दखल घेत मुंबई गाठून मंत्रालयस्तरावरुन या कामांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. निकृष्ट कामामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार नाही आणि शासनाच्या हेतूलाही हरताळ फासला जाईल. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरुन ही चौकशी होणार असून, आपण स्वत: त्याकडे लक्ष ठेवून असल्याचे आ.गजबे यांनी सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
48H9B
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना