मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविताना इतर सुविधांची निर्मिती आवश्यक:प्रा.सतीश अग्नीहोत्री

Saturday, 23rd June 2018 05:52:50 AM

       

गडचिरोली,ता.२३: शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी त्यांना हमीभाव आणि साठवणूक साधनांची उभारणी करुन देण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आय.आय.टी. मुंबईचे प्राध्यापक सतीश अग्नीहोत्री यांनी 'गडचिरोली संवाद' अंतर्गत 'कृषी व संलग्न सेवा' या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी केले. 

आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत आज सकाळच्या सत्रात प्रा.अग्नीहोत्री यांचे मुख्य भाषण झाले. या विचार मंथन आणि प्रशिक्षणाचा आज चौथा दिवस होता. याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य वनसंरक्षक एटबॉन, सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराभाई हिरालाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, वनसंरक्षक शिवाजी फुले, कृषी विभागाच्या सह संचालक श्रीमती कडू, सहायक जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, जिल्हा कृषी अधीक्षक अनंत पोटे, आत्माचे डॉ. प्रकाश पवार आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. 

उत्पादन आणि उत्पादकता वृध्दीची सांगड बाजारभावाशी घालणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून प्रा.अग्नीहोत्री म्हणाले की, कृषी क्षेत्रातील उपजीविकेसाठी उत्पादन झालेल्या ठिकाणी साठवण आणि प्रक्रिया यांची व्यवस्था झाली तरच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढू शकते. केवळ प्रक्रिया करुनच दर्जेदार उत्पादनास चांगली बाजारपेठ मिळू शकते, याचा विचार करुन सर्वच स्तरावर शेतकऱ्यांना साहाय्य करण्याचे काम कृषी विभागाने करावे, असे प्रा. अग्नीहोत्री यांनी सांगितले.  

याप्रसंगी भूमिका मांडताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले की, विविध प्रकारची माहिती आपण गोळा करतो. पण, त्याचे विश्लेषण मात्र करीत नाही. बऱ्याच प्रसंगी माहितीत प्रामाणिकपणाचा अभाव असतो. गोळा होणाऱ्या आकडेवारीचे विश्लेषण केले तरच त्यामागची कारणे आपणास सापडतील. प्रत्येकाने आपापल्या भागात असे विश्लेषण करुन त्यात सुधारणा केली, तरच विकास योग्य पध्दतीने हाईल. जिल्हयात कृषी संलग्न कामे  वाढवण्याची  गरज असून, त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत शक्य होईल, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हयात फलोत्पादनाला वाव आहे. कोरचीतील जांभळं, सिरोंचातील कलेक्टर आंबा फक्त प्रसिध्द आहे. मात्र, त्यांची लागवड मोठया प्रमाणावर नाही. वनोपजातून शेतकऱ्यांना जादा फायदा मिळू शकतो, या भूमिकेतून योजना राबवल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. 

सामूहिक वन पट्टे वाटप केल्याने गावकऱ्यांना ११ लाख हेक्टर जमीन मिळाली आणि शेतीखाली केवळ २ लाख हेक्टर जमीन आहे. यावरुन अधिक उत्पन्नाची क्षमता गडचिरोलीत आहे हे सिध्द होते. या वनक्षेत्राचा योग्य वापर करा, शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहन द्या, तसेच जिल्हयात दुग्धोत्पादन वाढवा, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यावेळी म्हणाले. 

जिल्हयात वनसंपत्ती भरपूर आहे. त्या माध्यमातून उपजीविकेचे १५ प्रकल्प वन विभागाने सुरु केले. मात्र, गुणवत्ता आणि विपणन यात हा जिल्हा मागे पडला आहे. यात बदल झाला पाहिजे, असे मुख्य वनसंरक्षक एटबॉन यांनी यावेळी सांगितले. 

आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात वन विभाग आणि आदिवासी विभाग यांचे निर्देशांक नाहीत, ते समाविष्ट करुन प्रशासनाने केंद्र सरकारला कळवावे, अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांनी यावेळी आपल्या भाषणात केली.  गडचिरोली अनुसूचित क्षेत्र आहे. येथे आदिवासी समाजाच्या वेगळया परंपरा आहेत. त्यातील 'इलाका' सारखी परंपरा या कार्यात वापरावी, असे सांगून ते पुढे म्हणाले की, प्रत्यक्षात ग्रामसभेने सर्व जबाबदारी स्वीकारुन या विकास कामाचे जनआंदोलन उभे केले, तरच यात यश शक्य आहे. यासाठी मी पासून आम्ही ही भूमिका नागरिकांनी स्वीकारण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. 

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी टी. एस. तिडके यांनी केले. या कार्यक्रमास कृषी, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, रेशीम उद्योग आदी विभागांचे अधिकारी तसेच माविम, उमेद यांच्यासह स्वयंसेवी संघटना आदींचे पदाधिकारी उपस्थित होते. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
J1NPU
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना