गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

चला, निसर्गाच्या सफाई कामगाराचे संरक्षण करु या!

Friday, 31st August 2018 11:33:12 PM

जगात साधारणत: प्रत्येक भागात आढळणारा मोठा मांसभक्षीय पक्षी म्हणून गिधाड पक्ष्याची ओळख आहे. याला निसर्गाचा स्वच्छतादूत म्हणूनसुद्धा ओळखतात. जगात गिधाडांच्या २३ प्रजाती आहेत. गिधाडे मृत पाळीव जनावरांचे मांस भक्षण करतात. गिधाड हा अन्नसाखळीतील एक महत्वाचा घटक आहे. ते कधीही शिकार न करता केवळ मृत जनावरांच्या मांसावर उदरनिर्वाह करतात. गिधाड हा समुहाने राहणारा पक्षी असून, सडणाऱ्या मासाला खाऊन त्यापासून पसरणारी दुर्गंधी व लागण करणाऱ्या रोगांवर नियंत्रण ठेवतात. तसेच उंदीर व कुत्र्यांपासून पसरणाऱ्या रोगांवरदेखील आळा घालण्याचे काम करतात. त्यांच्यामुळेच नैसर्गिक संतुलन ठेवले जाते व पर्यावरणाचे संरक्षण होते.

भारतात गिधाडांच्या नऊ प्रजाती आढळतात- व्हाईट रम्प्ड व्हल्चर, स्लेंडर बिल्ड व्हल्चर, इंडियन व्हल्चर, लाँग बिल्ड व्हल्चर इत्यादी. परंतु मागील ३० वर्षांत गिधाडांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. २००३ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, पाळीव जनावरांच्या वेदना कमी करण्यासाठी त्यांना डायक्लोफेनेक नामक औषध दिले जात होते. हे औषध प्राशन केलेल्या जनावराचा मृत्यू झाला आणि त्याचे मांस गिधाडाने खाल्ले तर त्यांना मुत्राशय, व्हिसरल गोट व नेक ड्रूपींग यासारखे आजार होऊन ते मरतात. १९९० च्या दशकात डायक्लोफेनेक औषधाचा अतिवापर झाल्याने ९९ टक्के गिधाडे कमी झाली.

१९८० पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात पांढऱ्या पाठीचे व लांब चोचीच्या गिधाडांची संख्या भरपूर होती. परंतु अलिकडच्या काही वर्षात डायक्लोफेनेकचा अतिवापर, वयस्क जनावरांची कत्तलखान्यात विक्री करणे, कीटकनाशकांचा अतिवापर व घरटी करण्यायोग्य मोठ्या झाडांची तोड यामुळे गिधाडांच्या प्रजननावर विपरित परिणाम होऊन त्यांची संख्या कमी झाली आहे. 

गिधाड संरक्षणासाठी गडचिरोली वनविभागाच्या उपाययोजना

निसर्गाचे सफाई कामगार असलेल्या गिधाडांची संख्या वाढविण्यासाठी गडचिरोली वनविभागाकडून उपायोजना केल्या जात आहेत.  वनविभागाच्यावतीने मारकबोडी, नवेगाव(रै) व उत्तर धानोरा परिक्षेत्रातील निमगाव येथे उपहारगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. गिधांडाचा वावर असणाऱ्‍या ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी सातत्याने लक्ष ठेवून असतात व वेळोवेळी मृत जनावरे उपहारगृहात पुरवठा करीत असतात. या उपहारगृहास पुरवठा केलेल्या मृत जनावराच्या बदल्यात जनावर मालकास आर्थिक मोबदलासुद्धा दिला जातो. 

गिधार संरक्षण व संवर्धन कामी वनविभागाकडून इतर कामेही केली जात आहेत. यासाठी वनपाल दर्जाच्या कर्मचाऱ्‍यांची सन २०११ मध्ये केंद्रस्थ अधिकारी नेमणूक केली आहे. हे अधिकारी गिधाडांच्या हालचालीवर लक्ष ठेवून असतत. झाडांवर गिधाडांची घरटी आढळल्यास त्यांचे संरक्षण करण्याबाबत गावकऱ्‍यांना प्रोत्साहीत करण्याचे काम ते करीत आहेत. तसेच स्थानिक स्तरावर गिधाडमित्रांची नियुक्ती केली असून जखमी, आजारी गिधाडे दृष्टीस पडताच तत्काळ त्यांच्यावर उपचार करणे, देखभाल करणे आदी कामे त्यांच्या मदतीने केली जात आहे. वनविभागातर्फे साजरे होणारे विशिष्ट दिनाच्या औचित्याने शालेय विद्यार्थ्यांची सहल आयोजित केली जाते व त्यांना गिधाड उपहारगृह दाखवून गिधाडाबाबत माहिती दिली जाते. निसर्गात गिधाडांचे महत्व काय आहे, त्यांना निसर्गाचे स्वच्छतादूत का म्हणतात, याबाबत माहिती देण्यात येते. 

वनविभागाच्या वतीने दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी 'जागतिक गिधाड जागृती दिन' साजरा करण्यात येतो. यात स्थानिकांना; विशेष करून शालेय विद्यार्थ्यांना गिधाडाबाबतची माहिती विशद केली जाते. तसेच १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहाच्या आयोजनाच्या वेळीही गिधाडांबाबत माहिती दिली जाते. 

गिधाड संवर्धनाकरिता भविष्यातील वाटचाल     

१) गिधाड संवर्धन क्षेत्रात नवीन गिधाड उपहारगृहची स्थापना करणे, २) गिधाडांचे वावर असलेल्या गावात गिधाड मित्रांची चमू तयार करणे. ३) गिधाडाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी व्हल्चर केअर सेंटर व रेस्क्यू सेंटरची स्थापना करणे.  ४) स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने सार्वजनिक व खासगी जागेवर गिधाडांसाठी सुरक्षित राहण्याची जागा निर्माण करणे ५) गिधाडांचे संवर्धन व प्रजननासाठी संशोधन कार्यक्रम हाती घेण्यात येणार. ६) गिधाडांचे पर्यावरणातील महत्व, त्यांचे वर्तन याबाबत माहिती होणे, जागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणे. ७) गिधाड संवर्धन कार्यात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी नियोजन करणे. ८) वनकर्मचाºयांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करणे आदी बाबीवर वनविभागाच्यावतीने भर देण्यात येणार आहे.

गडचिरोली वनविभागातर्फे १ ते ७ सप्टेंबरपर्यंत 'वल्चर डे' राबविण्यात येतो. या वल्चर डे मध्ये जिल्ह्यातील पक्षी प्रेमींनी सहभागी होऊन वनविभागाला या मोहिमेत हातभार लावावा, असे आवाहन मी यानिमित्ताने करु इच्छितो.

-शिवाजी फुले(भावसे)

उपवनसंरक्षक

गडचिरोली वनविभाग, गडचिरोली


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
091BS
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना