शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

चारही विचारप्रवाहांनी जगाला खरा गांधी सांगितला नाही:प्रा.सुरेश द्वादशीवार

Monday, 13th January 2020 07:46:12 AM

गडचिरोली,ता.१३: देशात मार्क्सवादी, आंबेडकरवादी, हिंदुत्ववादी व गांधीवादी असे चार विचारप्रवाह मानणारे लोक आहेत. परंतु चौघांनीही जगाला खरा गांधी सांगितला नाही; अशी खंत सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत व संपादक प्रा.सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली.

दंडकारण्‌य शैक्षणिक, सांस्कृतिक विकास व संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत गोविंदराव मुनघाटे यांच्या जयंतीनिमित्त ‘कमल-गोविंद प्रतिष्ठान’च्या वतीने येथील सुमानंद सभागृहात आयोजित ‘गांधी समजून घेताना’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, प्रा.डॉ.प्रमोद मुनघाटे, प्रतिष्ठानचे आमंत्रक पांडुरंग म्हशाखेत्री, अभियंता सुरेश लडके, देवाजी नरुले, प्रा.दुधमोचन, प्रा.अरविंद बंदे मंचावर उपस्थित होते.

दीड तासाच्या भाषणात प्रा.द्वादशीवार यांनी ऐतिहासिक घडामोडी व जागतिक विचारवंतांचे दाखले देत श्रोत्यांना म.गांधी समजावून सांगितला. काळ बदलला तरी काही मूल्ये बदलत नाही. सत्य,अहिंसा ही अशीच मूल्ये असून, म.गांधी हे अशा मूल्यांचे प्रतिनिधी आहेत. गांधी हे अमर प्रकरण आहे. म्हणूनच आपण त्यांचा जयजयकार करतो आणि पुढची पिढीही तो करत राहील. म.गांधी हे सबंध जगावर आपलं गारुड कायम ठेवणारं व्यक्तिमत्व आहे, असे प्रा.सुरेश द्वादशीवार म्हणाले.

द्वादशीवार म्हणाले, गांधीजींवर एक लाख पुस्तके लिहिण्यात आली. युनायटेड एक्स्प्रेस या अमेरिकेतील नियतकालिकाने जेव्हा जगातील १० हजार नागरिकांना प्रश्न विचारला;तेव्हा ८८८६ जणांनी म.गांधी हेच सर्वश्रेष्ठ होते, असे उत्तर दिले. म्हणूनच विचारवंतांबरोबरच आता कलावंतही गांधीजींचा विचार करु लागले आहेत. ‘तुमच्या देशात म.गांधी झाले नसते तर माझ्यासारखा कृष्णवर्णीय माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला नसता’, असे बराक ओबामा भारताच्या संसदेत येऊन बोलून गेले. यावरुनही गांधीजींचे मोठेपण लक्षात येते, असे प्रा.द्वादशीवार म्हणाले.

गांधीजींच्या बाबतीत मार्क्सवादी, हिंदुत्ववादी, गांधीवादी आणि आंबेडकरवादी हे चारही विचार मानणाऱ्या लोकांमध्ये गैरसमज आहेत. मार्क्सवादी मार्क्सच्या पलिकडे ज्ञान जाऊ शकत नाही, असे म्हणत राहिले. गांधीजी भांडवलदारांच्या मदतीने समाजवाद आणू इच्छित आहेत आणि आम्ही मात्र शेतकरी व कामगारांचे राज्य आणतो, असे तेव्हा मार्क्सवादी आणि समाजवादीही म्हणायचे. परंतु प्रत्यक्षात देशातील शेतकरी या दोघांच्याही मागे न राहता गांधीजींचा जयजयकार करीत होता. मार्क्सच्या नंतर माओ त्से तुंग याने शहरं ही खेड्यांची पिळवणूक करतात, असं म्हटलं, तर गांधीजींनी विषमता नाहीसी करायची असेल तर शोषकांच्याच हाती सत्ता दिली पाहिजे, असं सांगून खेडी स्वयंपूर्ण करण्याचा विचार मांडला, असे प्रा.द्वादशीवार म्हणाले.

हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींना मुस्लिमांचा अनुनय करणारा व फाळणीला जबाबदार असणारा नेता ठरवलं. परंतु म.गांधी जन्माला येण्यापूर्वी १८५२ मध्ये पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीनं फाळणीचा विचार केला. १९०६ मध्ये मुस्लिम लीगने व त्यानंतर १९१६ मध्ये मध्ये लोकमान्य टिळक व बॅरि.जीना यांच्यात झालेल्या करारानेही विभक्त मतदारसंघ मान्य केले. स्वातंत्र्यानंतर घटना समितीत गांधीजींना मानणारे लोक अधिक असतानाही त्यांनी विभक्त मतदारसंघ अमान्य केले. खरे तर फाळणी मुस्लिम लीगने मागितली आणि हिंदुत्ववादी मंडळी द्विराष्ट्रवादाची भूमिका मांडत राहिले. अशावेळी गांधीजी एकात्मतेची भाषा बोलत राहिले, अशी मांडणी द्वादशीवार यांनी केली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दर सहा महिन्यांनी एक माफीनामा इंग्रजांना पाठविला. सावरकर व गांधीजी यांच्यात प्रकृतीभेद होते. तरीही गांधीजींनी मुंबई काँग्रेसच्या व त्यानंतरच्या काकीनाडा येथील अ.भा.काँग्रेसच्या अधिवेशनात सावरकरांची सुटका करण्याचा ठराव मांडला आणि १९२१ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुटका झाली. त्यावेळी गांधीजी हे कस्तुरबासोबत स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरीला भेटायला गेले, हे विसरता येणार नाही, असे सांगून प्रा.द्वादशीवार यांनी १९२५ नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गांधीजींना हिंदुद्वेष्टा ठरवून राजकारण सुरु केलं, अशी टीका केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांसाठी राखीव मतदारसंघांची मागणी केली; त्याविरोधात गांधीजींनी उपोषण सुरु केलं. या चार दिवसांच्या उपोषणामुळे देशातील अनेक हिंदूंची मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली झाली, पुढे बाबासाहेब आंबेडकर हे गांधीजींचे चरित्रकार लुई फिशर यांना घेऊन आताच्या रमाईनगरात गेले. तेथील अस्पृश्यांची परिस्थिती पाहून लुई फिशर यांनी बाबासाहेबांना प्रश्न केला, ’अस्पृश्यांची अशी परिस्थिती असताना आपण पुणे करार का केला?’. यावर ‘मला समजून घेणारा एकच व्यक्ती आहे तो म्हणजे गांधीजी’, असे उत्तर बाबासाहेबांनी दिल्याचे प्रा.द्वादशीवार यांनी सांगितले.

गांधीवाद्यांबाबतही प्रा.द्वादशीवार यांनी परखड मत मांडले. गांधीवाद्यांनी जगाला खरा गांधी समजावून सांगितला नाही. केवळ सूत कातणारा गांधीच ते सांगत राहिले. त्यांनी लढाऊ गांधी सांगितला नाही. देशात ४० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या; तेव्हा सर्वोदयी म्हणणाऱ्या गांधीवाद्यांना कधी मोर्चा काढावासा वाटला नाही, कधी सत्याग्रहही केला नाही. ही मंडळी आपापले आश्रम आणि कुट्या सांभाळत राहिले. विनोबा भावेंना गांधीजींचा अवतार मानत राहिले. विनोबांना सत्याग्रह हा शब्दही आवडत नव्हता. गांधीजींकडे विनोबांच्या चष्‌म्यातून पाहिले तर संघर्ष संपतो. म्हणूनच तरुण गांधीजींच्या मागे गेले, विनोबांच्या नाही, अशी टीका प्रा.द्वादशीवार यांनी केली.

लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला तेव्हा ब्राम्हण मंडळींनी ब्राम्हणच टिळकांच्या मृतदेहाला खांदा देऊ शकतात, असे सांगितले. त्यावेळी म.गांधी आणि बॅरि.जीना यांनी टिळकांच्या मृतदेहाला खांदा दिला, सरदार पटेलांवर गांधीजींनी अन्याय केल्याचे हिंदुत्ववादी सांगतात. पण, पटेल हे वयस्क व आजारी असल्याने त्यांनी पंडित नेहरुंकडे धुरा सोपवली. स्वत: सरदार पटेलांनीदेखील आपल्यावर अन्याय झाल्याचे कधी म्हटले नाही. परंतु भलतेच लोक सरदार पटेलांचे वकिलपत्र घेऊन फिरत आहेत, असे सांगून प्रा.द्वादशीवार यांनी गैरसमज असणारे लोक सत्तेवर असतील, तर गैरसमज आणखीनच वाढतील आणि त्यामुळेच खरे गांधी समजून घेण्याची गरज प्रतिपादित केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.प्रमोद मुनघाटे यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
TS41V
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना