गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

धर्मरावबाबांनी केला उच्चशिक्षित लेडी टॅक्सी ड्रायव्हर किरण कुर्मावारचा सत्कार

Friday, 16th October 2020 01:09:05 AM

गडचिरोली,ता.१६: उच्चशिक्षित असूनही नोकरीच्या मागे न लागता टॅक्सी चालवून प्रवासी वाहतूक करणाऱ्या किरण कुर्मावार हिची अलीकडेच इंडिया बूक ऑफ रेकार्ड्सने नोंद घेतली आहे. याबद्दल माजी मंत्री, आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी आज अहेरी येथील आपल्या निवासस्थानी किरणचा सत्कार केला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, रेगुंठाचे सरपंच श्रीनिवास कडार्ला, परपटला सत्यनारायण तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी धर्मरावबाबांनी किरण कुर्मावार हिचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करीत तिचे कौतुक केले.                                             कोण आहे ही किरण?                                                                                                                                                                        सिरोंचा तालुकास्थळापासून ७० किलोमीटर अंतरावरील रेगुंठा या गावची किरण कुर्मावार ही रहिवासी. पक्क्या रस्त्यांचा अभाव, डोंगराळ भाग आणि नक्षल्यांची दहशत हे रेगुंठा परिसराचे वैशिष्ट्य. परिसरात महामंडळाच्या बसेसचे दर्शनही एखाद्यावेळीच होते. आदिवासीबहुल रेगुंठा परिसरात उच्चशिक्षणाची सोय नाही. अशाही स्थितीत किरणचे वडील रमेश कुर्मावार यांनी आपल्या तिन्ही मुलींना उच्चशिक्षित केलं. किरणला दोन विवाहित बहिणी आहेत. मोठ्या बहिणीने हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून रसायनशास्त्रात एमएससी केले आहे, तर दुसरीने बायोटेक्नॉलॉजीमध्ये. सर्वांत लहान असलेली २४ वर्षीय किरण ही हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. झाली आहे. प्रवासी वाहतूक करणे हा किरणचे वडील रमेश कुर्मावार यांचा व्यवसाय. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पायाला अपघातामुळे दुखापत झाली. त्याच सुमारास किरण दिल्लीत एव्हीएशनचा अभ्यासक्रम करीत होती. परंतु वडील आता फार काम करु शकणार नाही, असे लक्षात आल्याने किरणने गावाचा रस्ता धरला. हातात स्टेअरिंग घेतली आणि रेगुंठा ते सिरोंचा असा ७० किलोमीटरचा प्रवास ती दररोज करु लागली. सकाळी प्रवासी घेऊन रेगुंठ्याहून निघायचे आणि संध्याकाळी परत जायचे, असा किरणचा नित्यक्रम आहे. म्हणूनच नक्षल्यांच्या सावटात कडेकपारीतून ड्रायव्हींग करणाऱ्या किरणची इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड्सने नोंद घेतली. अलीकडेच तिला एका ऑनलाईन समारंभात हा पुरस्कार बहाल करण्यात आला.

प्रवासादरम्यान कुणी गरीब प्रवासी दिसला, तर त्याच्याकडून प्रवासी भाडे घेण्यास किरणचं मन धजावत नाही. रस्त्यात कुणाचा अपघात झाला, तर किरण स्वत:चे वाहन घेऊन मदतीला जाते. अशी ही हळव्या मनाची ड्रायव्हर तरुणी आपल्या आई-वडिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे. इतरही तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन ती करते आहे.                  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UM488
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना